काँग्रेसमध्ये घराणेशाहीला ब्रेक ! पदाधिकारी बदलात नव्या चेहऱ्यांना संधी !!
schedule14 Apr 26 person by visibility 82 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पक्ष कार्यकर्त्यांचा पण पदाधिकारी निवडी आणि पद वाटपाची वेळ आली की त्या ठिकाणी ठराविक कुटुंबे व नेतेमंडळीची वर्णी. तालुका पातळीवरील निवडी असोत की शहर आणि जिल्हास्तरावरील निवडी. बहुतांश वेळेला नेतेमंडळीच्या मर्जीतील मंडळींना पदाची खुर्ची. वर्षानुवर्षे काँग्रेसमधील ही घराणेशाही कायमच चर्चेची ठरलीय. या प्रकाराला कुठलेही शहर अपवाद नाही. पद वाटप करताना ना कार्यकर्त्यांशी संवाद…ना त्यांच्याशी चर्चा…वरिष्ठ नेत्यांनी ठरवायचं आणि नावे घोषित करायची…हे आतापर्यंत चाललेली पद्धत. आता मात्र या पद्धतीत काँग्रेसने बदल केला आहे. संघटन सृजन अभियान अंतर्गत आता कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत, त्यांची मते आजमावत पदाधिकारी निवडी होणार आहेत. यामुळे काँग्रेसमधील घराणेशाहीला ब्रेक बसून पदाधिकारी बदलात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये सुद्धा बदल संभवत आहेत. अगदी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, शहराध्यक्ष अशा प्रत्येक पदासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ज्यांना पक्षासाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे. संघटनेसाठी कार्यरत राहायचं आहे असा कार्यकर्ता त्या पदासाठी नेतेमंडळीकडे ईच्छा व्यक्त करू शकतो. काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संकल्पनेतून ‘संघटन सृजन अभियान’सुरू आहे. या अभियान अंतर्गत काँग्रेस अंतर्गत जिल्हा, शहर व तालुका पातळीवर नवीन चेहऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हा थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीशी जोडला जाणार आहे. निवडणूक कालावधीत तिकीट वाटपात जिल्हाध्यक्षांच्या मताला महत्व असणार आहे.
संघटन सृजन अभियान अंतर्गत कोल्हापूरसाठी मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक, खासदार प्रतिभा धानोरकर, प्रवक्ते सचिन सावंत, नंदकुमार कुंभार, राहुल गायकवाड, सुनील मलके, राहुल वरदा, कुंदा जेनेकर हे तेरा एप्रिल २०२६ पासून आठ दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. खासदार शाहू महाराज व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अभियानाला सुरुवात झाली. निरीक्षक म्हणून आलेले नेतेमंडळी प्रत्येक तालुकानिहाय दौरा करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत. पहिल्याच दिवशी या नेतेमंडळींनी कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येक तालुक्यातील दौरा निश्चित केला आहे.
……………….
कोल्हापूर शहरसाठी सहा जण इच्छुक….नगरसेवकांचा समावेश
कोल्हापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी सहा जण इच्छुक आहेत. सध्या काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक सचिन चव्हाण आहेत. ऑक्टोबर २०२१ पासून ते शहराध्यक्षपदावर आहेत. संघटन सृजन अभियानतंर्गत सोमवारी, (तेरा एप्रिल २०२६) कोल्हापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी सहा जणांनी तयारी दर्शविली आहे. यामध्ये विद्यमान अध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक अर्जुन माने, राहुल माने, प्रताप जाधव, सुभाष बुचडे आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी शहराध्यक्षपदाची मागणी केली आहे.