राज्यस्तरीय विज्ञान कथा स्पर्धा, कथा पाठविण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत
schedule18 Jul 25 person by visibility 61 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अक्षर दालन आणि निर्धार प्रतिष्ठान आयोजित ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पारितोषिक विजेत्या कथासंग्रहाचे पुस्तक प्रसिध्द केले जाईल. हे पुस्तक प्रतिवर्षी डॉ. नारळीकर यांच्या स्मृतिदिनी २० मे रोजी प्रकाशित करून याच दिवशी कथा स्पर्धेचे पुरस्कार वितरण आणि व्याख्यान असा कार्यक्रम होईल अशी माहिती संयोजक व ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, प्रकाशक अमेय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धा आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, ‘डॉ. जयंत नारळीकर यांचे स्मरण कायम राहण्याबरोबरच मराठी साहित्याला सकस विज्ञानकथांच्या स्वरूपातून नवलेखकांचे योगदान देणे. युवा वर्गाला सकस विज्ञान कथालेखनाला प्रवृत्त करणे हा आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये व सन्मानपत्र, द्वितीय पारितोषिक ४ हजार रुपये व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ पारितोषिक २ हजार रुपये व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ पारितोषिक १ हजार रुपये व सन्मानपत्र असे बक्षीस आहे. निकष पूर्ण करणाऱ्या स्पर्धात्मक कथांसाठी सन्मानपत्र दिले जाईल. कथा ३ हजार ते ५ हजार शब्दांपर्यंत असावी आणि अप्रकाशित असावी.
कथा वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करणारी असावी. कोणत्याही वयाच्या स्पर्धकाला भाग घेता येईल. स्पर्धकांनी आपल्या कथा ई मेलवर (Email-vidnyankathanaralikar@gmail.com) पाठवाव्यात. कथा पाठविण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ आहे. स्पर्धकांनी आपली किमान माहिती, पत्ता, संपर्क क्र., शिक्षण, अनुभव, कौशल्य इतर माहिती कथेसोबत पाठवावी. स्पर्धकांनी आपल्या कथा ई मेलने पाठवाव्यात. कथा युनिकोड टाईपमध्ये असाव्यात व वर्ड फाईल असावी. प्रवेश निःशुल्क आहे. अक्षर दालन, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ कोल्हापूर मोबाईल क्र. ८७८८९५८००५ संपर्क साधावा.