प्राधिकरणला विशेष दर्जा, हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे आमदार चंद्रदीप नरकेंचा सत्कार
schedule16 May 26 person by visibility 44 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणला विशेष दर्जा मिळाल्याबद्दल कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी पेठ येथील आमदार नरके यांच्या निवासस्थानी हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरके यांची भेट घेतली. प्राधिकरणला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी आमदार नरके यांनी पाठपुरावा केला. आता विशेष दर्जा मिळाल्याबद्दल प्राधिकरणला सरकारकडून थेट निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. प्राधिकरणला प्राप्त निधीतून संबंधित गावांच्या विकासाची कामे होतील अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, कृती समितीचे कार्याध्यक्ष व उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, इंद्रजीत पाटील, गोकुळचे माजी संचालक एस. आर. पाटील, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे आदींच्या शिष्टमंडळाने आमदार नरके यांचा सत्कार केला. ‘प्राधिकरणला विशेष दर्जा मिळाल्याबद्दल निधी उपलब्ध होणार आहे. त्या निधीच्या माध्यमातून प्राधिकरणमध्ये समाविष्ठ गावांच्या विकासकामांना चालना मिळेल.प्राधिकरणला विकास कामांवर फोकस करता येईल.’ असे आमदार नरके यांनी सांगितले.