जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस, तर सरपंचावरही कारवाई ! सीईओंनी काढला आदेश
schedule19 Nov 25 person by visibility 520 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गावांना करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत परिसरात आवश्यक स्वच्छतेविषयक सुविधा निर्माण न केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापैकी ३५ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरही कारवाई का करू नये यासंबंधी खुलासा मागविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या आदेशानुसार या नोटिसा लागू केल्या आहेत.
भुदरगड तालुक्यातील नाधवडे, गारगोटी , हणबरवाडी, मिणचे बुद्रुक , हेदवडे तर चंदगड तालुक्यातील दाटे, गुडेवाडी, बुजवडे ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर, हातकणंगले तालुक्यातील रुकडी, यळगूड, शिरोली पुलाची, टोप भेंडवडे तर करवीर तालुक्यातील निगवे खालसा, कुर्डू, वडकशिवाले, चुये, नांदगाव ग्रामपंचायतींना नोटीसा लागू झाल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोलिक, राधानगरी तालुक्यातील धामोड, बुरंबाळी, राशिवडे बुद्रुक, शेळेवाडी, तिटवे तर शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी, उदगाव, कवठेगुलंद, गौरवाड, टाकळी, घोसरवाड, जुने दानवाड ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस काढली आहे. या ग्रामपंचायतींना पंधरा दिवसांचा अवधी दिला असून या अवधीमध्ये स्वच्छता सर्वेक्षणामधील स्रोतांभोवताली आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून पिवळ्या कार्डाचे रूपांतर हिरव्या कार्ड मध्ये करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत फेर सर्वेक्षण करून घेण्याच्या सूचना सीईओंना दिल्या आहेत.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत शुद्ध व गुणवत्तापूर्वक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. प्रत्येक वर्षी वर्षातून दोन वेळेस पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या परिसराचे स्वच्छता सर्वेक्षण आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागाकडून संयुक्तपणे होते. एप्रिल २०२५ मध्ये पावसाळ्यापूर्वीचे स्वच्छता सर्वेक्षण झाले होते. यामध्ये स्रोताभोवती आढळलेल्या त्रुटींच्या आधारे ग्रामपंचायतीना पिवळे कार्ड देण्यात आलेले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सुधारणा करून पिण्याचे पाण्याच्या स्रोतांभोवताली आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून पिवळ्या व लाल कार्डाचे रूपांतर हिरव्या कार्डामधे करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या होतय. पावसाळा संपल्यानंतर एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत स्वच्छता सर्व्हेक्षण झाले. यामध्ये जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड प्राप्त झाले. आहे यामधील ३५ ग्रामपंचायती अशा आहेत ज्या एप्रिल २०२५ मधील स्वच्छता सर्वेक्षणाच्या पिवळ्या कार्डामध्ये आढळून आलेल्या होत्या. ही बाब अतिशय गंभीर असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंचावर ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम ३९ नुसार कारवाई का करू नये ? संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई का करू नये?अशा नोटिसा बजावलेल्या आहेत.