सौंदत्ती यात्रेसाठी एसटी भाडे- खोळंबा आकारात विशेष सवलत : आमदार राजेश क्षीरसागर
schedule19 Nov 25 person by visibility 76 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेकरिता विशेषबाब म्हणून किमान किलो मीटरप्रमाणे आकारणी न करता प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या किलो मीटरसाठी प्रति किलो मीटर ६४ रुपये दराप्रमाणे आकारणी व खोळंबा आकार दहा रुपये प्रति तास प्रति बस आकारण्यास मान्यता दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सौंदत्ती यात्रा डिसेंबर २०२५ मध्ये आहे. विशेष सवलती नुसार लागू करण्यात आलेले दर व खोळंबा आकार भाविकांना दिलासा देणारी आहे. सवलत आगामी डिसेंबर २०२५ व फेब्रुवारी २०२६ या महिन्यातील पौर्णिमेच्या यात्रेकरिता सौंदती यात्रा, कर्नाटक करिता विशेष यात्रा सवलत म्हणून असणार असल्याची माहितीही आमदार क्षीरसागर यांनी दिली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आमदार क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता.
सौंदत्ती डोंगर येथे असणाऱ्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी गेले १२ वर्षे सौंदत्ती येथे जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन यांच्या वतीने सलग तीन दिवस मोफत आरोग्य शिबीर आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही सलग तीन दिवस वैद्यकीय सेवा आणि अल्पोपहार सेवा भाविकांसाठी उपलब्ध असणार असून, याचाही लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले आहे.