पाच- सहा जूनला रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा
schedule01 Jun 26 person by visibility 40 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने पाच व सहा जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त किल्ले रायगड येथे विविध कार्यक्रम होत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून १६७४ रोजी ‘राज्याभिषेक सोहळा’झाला होता. त्या ऐतिहासिक स्मृतींना या सोहळयाद्वारे उजाळा देण्यात येणार आहे.’अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.
युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी चाळीस कमिटया कार्यरत आहेत. गेले तीन महिने या सोहळयाची तयारी सुरू आहे. रायगड प्रशासनासोबत बैठक झाल्या आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरासह देशातील विविध भागातून जवळपास दहा लाख शिवभक्त येतील अशा प्रशासनाचा अंदाज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात यंदा, ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहिरांचा’ आणि ‘सोहळा पालखीचा’ हे मुख्य आकर्षण असणार आहे.
शुक्रवारी, पाच जून रोजी दुपारी ३.३० वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन करुन सोहळयास प्रारंभ होईल. दुपारी चार वाजता युवराज संभाजीराजे, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे नाणे दरवाजा येथे स्वागत व शिवभक्तांसह पायी गड चढण्यास प्रारंभ होईल. दुपारी ४.१५ वाजता नगारखाना येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे गडपूजन आहे.दुपारी ४.३० वाजता युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते, ‘धार तलवारीची…युद्ध्कला महाराष्ट्राची’ ही युद्धकलेची प्रात्यक्षिके होळीचा माळ येथे होणार आहेत. सायंकाळी सात वाजता होळीचा माळ येथे ढोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके व वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदंगाचा गजर होईल. रात्री आठ वाजता राजसदर येथे जागर शिवशाहिरांचा…स्वराज्याच्या इतिहासाचा हा शाहिरी कार्यक्रम आहे. रात्री नऊ वाजता शिरकाई मंदिर येथे देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम आहे. रात्री ९.३० वाजता जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून किर्तन व भजनाचा कार्यक्रम आहे.
शनिवारी, सहा जून रोजी सकाळी सात वाजता नगारखाना येथे युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण आहे. सकाळी ७.३० वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम होईल. सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसदर येथे आगमन होईल. सकाळी ९.५० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व श्री शिवछत्रपतींच्या महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक होईल. सकाळी १०.२० वाजता युवराज संभाजीराजे यांचे शिवभक्तांना जाहीर संबोधन आहे. सकाळी १०.३० वाजता ‘सोहळा पालखीचा…स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’पालखी सोहळयास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता श्री शिवछत्रपतींच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन आहे. दुपारी १२.१५ वाजता जगदीश्वर मंदिर येथे युवराज संभाजीराजी यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाला पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी १२.२५ वाजता श्रीशिवछत्रपतींच्या समाधीस अभिवादन करुन सोहळयाची सांगता होईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, प्रवीण हुवाळे, उदय घोरपडे, प्रकाश मोरबाळे, सचिन वरपे, संतोष देसाई, दिपक सपाटे साक्षी फराकटे, वसीम मोमीन, सत्यजीत आवटे, शाहीर दिलीप सावंत आदी उपस्थित होते.