महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी राजेंद्र पवार
schedule25 Apr 25 person by visibility 17 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरण कंपनीचे (मानव संसाधन) संचालक म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी (२५ एप्रिल) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांना महावितरणमधील सेवेचा ३६ वर्षांचा अनुभव आहे. पवार हे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भऊर येथील रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी येथे रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे. २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. तर गेल्या सव्वादोन वर्षांपासून श्री. पवार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
……………..
‘महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मानव संसाधनाचे एक आश्वासक व्यवस्थापन सदैव उपलब्ध राहील. कंपनी व कर्मचारी हिताला प्राधान्य देत अंतर्गत प्रशासकीय कामकाज आणखी गतिमान करण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यावर भर राहणार आहे.’
- राजेंद्र पवार, संचालक महावितरण कंपनी (मानव संसाधन)