पुस्तकं ही आयुष्याची संजीवनी ! सत्कारासाठी बुके नको-बुकं द्या !!
schedule25 Apr 25 person by visibility 363 categoryलाइफस्टाइल

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : ‘मला शुभेच्छा देण्यासाठी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणला नाही तरी चालेल, पण एखादे पुस्तक आणा. कारण पुस्तकं हीच माझ्या आयुष्याची संजीवनी आहे. आता माझ्या जीवनात यशाचा जो सुगंध दरवळत आहे, सत्काराची फुले बहरत आहेत त्याचे कारण पुस्तके आहेत…’हे बोल आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगात यश मिळवलेल्या बिरदेव सिद्धाप्पा डोणे या तरुणाचे.
२०२४ मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत बिरदेव हा ५५१ रँकने उत्तीर्ण झाला. शालेय जीवनापासून आयपीएस होण्याचे जे ध्येय पाहिलं ते साध्य झालं. गेले तीन दिवस बिरदेववर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. शाल, श्रीफळ, बुके, हार देऊन त्याचा सत्कार होऊ लागला आहे. अभिनंदनासाठी मोबाइल सतत खणखणत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना बिरदेव म्हणाला, ‘पुस्तक ही आयुष्याची संजीवनी आहे. मला शुभेच्छा देण्यासाठी येताना शुभेच्छा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुष्पहार आणला नाही तरी चालेल. एखादे आवडते पुस्तक आणा. त्या पुस्तकातून माझ्या जन्मगावी यमगेत वाचनालय तयार होईल. पुस्तके वाचून अधिकारी घडतील.’
बिरदेव हा कागल तालुक्यातील यमगे येथील. कुटुंबांचा मेंढपाळाचा व्यवसाय. यामुळे सतत फिरण. मेंढया चारण्यासाठी सतत भटकंती. ज्या दिवशी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या दिवशी बिरदेव हा बेळगाव परिसरात मेंढया चारत होता. ना कसली शैक्षणिक पार्श्वभूमी, ना घरी कोण मोठे अधिकारी…केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बिरदेवने लख्खं करणार यश मिळवलं. बिरदेव हा शालेय जीवनापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जाई. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. विद्यामंदिर यमगे येथे प्राथमिक शिक्षण, तर जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे माध्यमिक शिक्षण झाले. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के आणि बारावी परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवत मुरगुड केंद्रात प्रथम आला होता. गणित विषयात तर शंभर पैकी शंभर गुण मिळवले होते. दहावीत मुरगूड केंद्रात प्रथम आल्यानंतर गावकऱ्यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी बिरदेवने, आपण आयपीएस होणार असल्याचे सांगितले होते. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी बिरदेव पुणे, दिल्ली गाठली. दिवसरात्र अभ्यास केला. स्थापत्य विभागातून पदवी प्राप्त केलेल्या बिरदेव हा ध्येयापासून कधी ढळला नाही. प्रामाणिकपणाने कष्ट केलं की यश प्राप्त होते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. बिरदेवचे यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कशीही असो, स्वप्नं पाहायची, ती साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करायचं आणि ध्येय गाठायचं….ही शिकवण अनेकांना करिअरच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी प्रेरक ठरत आहे. |