पंतप्रधानांच्या सल्लागारांनी उलगडले देशाचे व्हिजन २०४७ ! म्हणाले, इन वर्ल्ड वुई आर दि बेस्ट !!
schedule27 Nov 22 person by visibility 1001 categoryशैक्षणिक

डी.वाय.पाटील इंजिनिअरींगतर्फे ‘व्हिजन -२०४७' विषयी व्याख्यान, देशाभिमान आणि देशभक्तीने वातावरण भारावले
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : “एकेकाळी परदेशातून गव्हाची आयात करणारा देश आज अन्नधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी , आरोग्य-शिक्षण-कृषी-तंत्रज्ञानातीलप्रगती जगभरात वाखाणण्याजोगी, देशाचे आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यही सक्षम, अमेरिकेसारखा बलाढय देश मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी हात पुढे करतो, इंग्लडला आपल्या मदतीची गरज वाटते, वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना बाळगणाऱ्या भारताने कोरोना आणि लॉकडाउन कालावधीत देशाच्या सीमा ओलांडून परदेशातील नागरिकांना केलेली वैद्यकीय मदत तर माणुसकीचा नवा धर्म स्थापन करणार. आत्मनिर्भर भारताची ही नवी ओळख. भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारत हा महासत्ता तर असेलच सोबतीला
साऱ्या जगाचे आशास्थान ठरेल. कारण जगात वुई आर दि बेस्ट आणि ऑदर इज वेस्ट !! …
हे आत्मविश्वासपूर्वक बोल आहेत दक्षिण आफ्रिकेतील भारताचे माजी राजूदत आणि दक्षिण आफ्रिका व लडाख विषयातील पंतप्रधानांचे विशेष सल्लागार डॉ दीपक वोरा यांचे.
डॉ. दीपक वोरा, वय वर्षे ७१, पण उत्साह तरुणाईलाही लाजविणारा. अनेक देशांमध्ये राजदूत म्हणून त्यांनी भारताची मान उंचावणारी कामगिरी केलेली. परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा त्यांचा गाढा अभ्यास. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे रविवारी (ता.२७ नोव्हेंबर) 'व्हीजन -२०४७' या विशेष व्याखानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वोरा यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत आत्मनिर्भर भारताचे दर्शन घडविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’संकल्पनेला मूर्त रुप मिळत आहे. ‘मेक इन इंडिया’याद्वारे समाज आणि देश विकासाच्या नवं संकल्पना आकार घेत आहेत हे विविध उदाहरणातून पटवून दिले.
हिंदी आणि इंग्रजी भाषेत खुमासदार शैलीत आणि शेरोशायरीची जोड देत डॉ. वोरा यांनी देशभक्ती- देशाभिमानाची उर्जा जागविली. तासाभराच्या प्रभावीशैली मांडणीमुळे भारावलेल्या नागरिकांनी व्याख्यान संपताच उभे राहून टाळयांचा कडकडाट केला. सोबतीला ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा’ या जयघोषाने हॉटेल सयाजीमधील मेघ मल्हार हॉलमध्ये दुमदुमला.
‘आत्मविश्वास, आत्मनिर्भरता व स्वच्छ पारदर्शक प्रतिमा यामुळे २०४७ पर्यंत नक्कीच महासत्ता बनेल. सध्या अमेरिकेची आर्थिक ताकदकमी झाली आहे, रशिया कमकुवत बनला आहे. तर चीनवर कोणाचाही भरोसा नाही अशा स्थितीत आपला भारताकडे सर्व जग आशेने पाहत आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअपना प्रोत्साहन यामुळे देश वेगाने प्रगती करत आहे.”असे वोरा यांनी नमूद केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वागत केले. शीतल मिरजे यांनी ओळख करून दिली. कार्यक्रमाला डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता, कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डॉ व्ही. व्ही. भोसले, अभियांत्रिकीचे प्राचार्य संतोष चेडे, डॉ एल.व्ही. मालदे, उद्योजक मोहन मुल्हेरकर, उपकुलसचिव संजय जाधव, सिनेट सदस्य प्रा. रघुनाथ ढमकले आदी उपस्थित होते.