अध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठक
schedule20 Nov 26 person by visibility 22 categoryगुन्हेजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जिल्हा परिषदेत विकासकामांसाठीच्या निधीचे समान वाटप व्हावे या मागणीसाठी काँग्रेसच्या सदस्यांनी शुक्रवारी (२० नोव्हेंबर २०२६) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन पुकारले होते. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव यांनी आंदोनलस्थळी भेट देऊन काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील सदस्य व शिवसेना ठाकरे पक्षाच्या सदस्यांनी निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आंदोलन केले. दरम्यान ‘निधीसदंर्भात काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे मंत्री महोदयासमोर मांडू. यासंदर्भात सकारात्मक निर्णय होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. हा विषय जिल्हा परिषद स्तरावरील नाही, मंत्री महोदयांशी चर्चा करू’ असे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आश्वस्त केले. तसेच आंदोलन मागे घेण्याविषयी अध्यक्ष खोत यांनी काँग्रेसच्या सदस्यांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेसच्या सदस्यांनी लाक्षणिक उपोषण दुपारनंतर मागे घेतले. दरम्यान जिल्हा परिषदेतील महायुतीचे पदाधिकारी, सदस्य यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत निधी वाटपासंबंधी चर्चा होणार आहे.