पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप सातारा-कोल्हापूर पुरुष गटाला विभागून
schedule04 Dec 24 person by visibility 29 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. दरम्यान या स्पर्धेचे जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष गटाला विभागून मिळाला तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारत जनरल चॅम्पियनशीप चषकाला गवसणी घातली.
कोल्हापूर परिक्षेत्रीय ५० व्या पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभ बुधवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघांना बक्षिस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडित, पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक सांगली संदिप घुगे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून एकूण १९ संघ एकल व सांघिक गटात सहभागी झाले होते. १२०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जवळपास १९ विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. पुढील वर्षीची स्पर्धा पुणे ग्रामीण यांच्याकडे आयोजित केली जाणार आहे. याची घोषणा व ध्वज हस्तांतरण यावेळी करण्यात आले. मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात वारणा व्हॅली स्कूल, तळसंदे येथील मुलांनी मल्लखांब क्रीडा प्रकारातील रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर केली. अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी आभार मानले.