नामविस्ताराला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध ! बाळासाहेब देसाईंचे नातूही आंदोलनात !!
schedule18 Mar 25 person by visibility 355 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) थेट विरोध केला आहे. विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’हेच कायम राहावे अशी भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविले आहे. तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे व कुलगुरू डी. टी. शिर्के यांनाही दिले. दुसरीकडे शिवाजी विद्यापीठ सेवक संघानेही विद्यापीठाचा नामविस्ताराला विरोध केला आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. या आंदोलनात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शिवराज देसाई यांनी सहभाग घेतला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे, ‘ शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिले पाहिजे. नामविस्तार केल्यास विद्यापीठाच्या नावाचा अपभ्रंश होण्याचा धोका आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व इतर नेतेमंडळींनी सर्वंकष विचार करुन विद्यापीठाचे नाव निश्चित केले आहे. विद्यापीठाच्या नामविस्ताराला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. ‘शिवाजी विद्यापीठ’हेच नाव कायम राहावे.’ शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, उत्तम कोराणे, संजय चितारी,संजय फराकटे, संभाजी पवार हर्षवर्धन चव्हाण, शिरीष देसाई, शिवाजीराव देसाई, दिगंबर परीट, सर्जेराव जरग, सुनील कांबळे, युवरााज पाटील,बाळासो माने, बाळकृष्ण लोखंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
………………
सेवक संघाची निदर्शने, नामविस्तार नको
शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने नामविस्ताराच्या विरोधात निदर्शने केली. ‘आमचं विद्यापीठ…शिवाजी विद्यापीठ, नको नको –नामविस्तार नको’अशा घोषणा दिल्या. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर हे आंदोलन झाले. या ठिकाणी झालेल्या द्वारसभेत सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी भूमिका मांडली. नामविस्तार केल्यास छत्रपती शिवरायांचे नाव नजरेआड होईल. यामुळे विद्यापीठाचे नाव ’शिवाजी विद्यापीठ’असेच राहिले पाहिजे. त्याद्वारे ‘शिवाजी’ हे नाव सतत लोकांच्यासमोर राहील. असे ते म्हणाले. आंदोलनाप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातेही उपस्थित होते. याप्रसंगी सेवक संघाचे उपाध्यक्ष संजय पोवार, सरचिटणीस राम तुपे आदी उपस्थित होते.