लिंगायत माळी समाजाचा तेरा ऑक्टोबरला मेळावा
schedule25 Sep 24 person by visibility 268 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचा वधू-वर पालक, समाज मेळावा व पुरस्कार वितरण समारंभ रविवारी, १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. राजारामपुरी येथील डॉ. व्ही.टी. पाटील सभागृहात सकाळी अकरा वाजता हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान खासदार शाहू महाराज हे भुषविणार आहेत. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल आवाडे, वीरशैव बँकेचे अध्यक्ष दिलीप चौगले, डॉ. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे आयुक्त संजय माळी, उद्योजक सी.एम. माळी, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजू वाली हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात वस्ताद मारूती माळी यांचा जीवन गौरव तर निवृत्त पोलिस उपनिरीक्षक शरद माळी यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, महिला संघटनेच्या अध्यक्ष साधना माळी, उपाध्यक्षा वंदना माळी व कार्याध्यक्षा मीनाक्षीताई माळी यांनी केले आहे.