गोकुळ जपू या - गोकुळ वाढवू या, डॉ. युवराज येंडुरेंच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश आंदोलनात शेतकरीही सहभागी
schedule08 Jul 26 person by visibility 132 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘ गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ दूध संघ हा लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे. तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. तेव्हा राजकारणासाठी गोकुळची बदनामी थांबवा’ अशी भूमिका मांडत सामाजिक कार्यकर्ते डॉ. युवराज येडुरे यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्पनजीकच्या चौकात झालेल्या या आंदोलनात शेतकरी व दूध उत्पादक सहभागी झाले. पावसाच्या सरी अंगावर झेलत आंदोलन झाले.
बुधवार, आठ जुलै २०२६ रोजी आंदोलन झाले. या आंदोलनात भुदरगड, कागल, राधानगरी परिसरातील शेतकरी व दूध उत्पादक सहभागी झाले. ‘गोकुळ जपूया, गोकुळ वाढवू या, सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे’या मजकुराचे फलक शेतकऱ्यांच्या हाती होते. या आंदोलनाप्रसंगी डॉ. येडुरे यांनी भूमिका स्पष्ट केली. गोकुळची स्वायत्तता, कामकाजात पारदर्शकता आणि शेतकरी केंद्रित कार्यपद्धती अबाधित राहावी. निवडणुकीच्या कालावधीत विनाकारण गोकुळची बदनामी करणाऱ्या विरोधक व सत्ताधारी मंडळीवर कायदेशीर कारवाई करावी, ठराव जमा करण्यासाठी दबाव तंत्र आणि होत असलेला व्यवहार याविषयी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
गोकुळ प्रधान कार्यालयाच्या आवारातील माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन शिष्टमंडळाने प्रशासक मंडळाला निवेदन दिले. गोकुळची प्रतिमा जपण्यासाठी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळच्या निवडणुकीत सभासदांना मतदानाचा अधिकार नाही. आगामी निवडणुकीत सर्व सभासदांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली. प्रशासक मंडळातील अधिकारी व सहायक निबंधक प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, यांना निवेदन दिले. येत्या पंधरा दिवसात या मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन जाहीर करू असेही येडुरे म्हणाले. दरम्यान सायंकाळी, शेतकऱ्यांच्या हस्ते दूध घेऊन आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात राहूल पाटील, प्रकाश पाटील, विश्वजीत पाटील, संदीप राजगिरे, संदीप देसाई, संतोष देसाई, आकाश पाटील, सुशांत पाटील, महेश देसाई, विकास गोठणकर, रणजित गुरव, जयवंत कळमकर आदींचा सहभाग होता.