पुस्तकातून नितीमूल्यांची शिकवण, अनुभवांची शिदोरी - कवी डॉ. दिलीप कुलकर्णी
schedule29 Dec 25 person by visibility 24 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विद्यार्थ्यांनी वाचक संस्कृती अंगिकारावी. थोरामोठयांच्या जीवनचरित्रातून आयुष्याला प्रेरणा मिळते. पुस्तके संस्काराची व नितीमूल्यांची शिकवण देतात.वाचनातून अनुभवाची शिदोरी लाभते. ’अशा शब्दांत कवी डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याना वाचनाचे महत्व पटवून दिले.
निमित्तहोते, पीएम श्री कुमार विद्यामंदिर नंबर तीन कुरुंदवाड येथे आयोजित बालसाहित्य संमलेनाचे. या शाळेने पुढाकार घेत बाल साहित्य संमेलन भरविले होते. कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, गटशिक्षणाधिकारी भारती कोळी व कुरुंदवाडचे नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन झाल्यावर ग्रंथदिंडी निघाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा रंगवल्या होत्या. ग्रंथदिंडी शहरातून फिरून संमेलनस्थळी दाखल झाली.
स्वागताध्यक्ष लेखक फारुख काझी यांनी संमेलनाचा उद्देश सांगितला. मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांनी स्वागत केले. लेखक किरण पाटील प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील मुलांनी आपल्या प्रतिभेतून तयार केलेली गरुडभरारी ही हस्तपुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यानंतर कथाकथन सत्राला सुरुवात झाली. शाळेतील वेदांत गवंडी, पूर्वा जाधव, सेजल पाटील, माहीरा मकानदार या मुलांनी देखील आपल्या कथा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर लेखिका प्रा. शशिकला सरगर यांनी लेखन आणि वाचनाचे महत्व याविषयी संबोधित केले.यानंतर कवी बबलू वडर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. राजेंद्र पाटील साहेब, आरती लाटणे, सुरेखा कुंभार, माणिक नागावे, पल्लवी पाटील मॅडम सच्चिदानंद आवटी, विद्यार्थी विराज कांबळे यांनी कविता सादर केल्या. अंगणवाडीच्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित एक नृत्य नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध लेखक मनोहर भोसले यांची मुलाखत घेतली. मुलाखतीसाठी स्वराज जान्हवेकर,जान्हवी पाटील ,अवधूत पाटील ,मुक्ता रावण कनक शिकलगार, स्वरा मोहिते, सुफिया मोमिन या मुलांनी भाग घेतला.
बाल साहित्य संमेलनाचे शेवटचे सत्र रंगले ते म्हणजे कवितेचे जेव्हा गाणे होते या सदराने. या सदरामध्ये शाळेतील शिक्षक शंकर दिवटे व विकास लाटकर यांनी कवितेला सुंदर चाली लावून ते गाण्याच्या रूपात सादर केल्या. त्यांच्यासोबत शाळेतील तनिष्का कुलगुडे, राही पट्टणशेट्टी,समीक्षा परीट, सुखदा जोशी व अर्सलान किल्लेदार विद्यार्थ्यांनी कविता गायनामध्ये सहभाग घेतला. महेश घोटणे यांनी सूत्रसंचालन केले.