कृष्णराजनी भरला उमेदवारी अर्ज, महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात !!
schedule27 Dec 25 person by visibility 662 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आंतरराष्ट्रीय कार रेसर आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र आहेत कृष्णराज च्या माध्यमातून महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात उतरली. त्यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. शनिवारी सकाळी रुईकर कॉलनी येथील त्यांच्या कार्यालयापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाहेर पडले. राजारामपुरी येथील निवडणूक कार्यालयापर्यंत ते कार्यकर्त्यांच्या सोबत आले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत निवडणूक कार्यालयात आणले. यावेळी त्यांच्यासोबत पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, स्थायी समितीचे माजी सभापती आशिष ढवळे, माजी नगरसेवक राजसिह शेळके, संजय निकम, इंद्रजीत जाधव समीर शेठ आदी उपस्थित होते. कृष्णराज महाडिक यांनी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांनी तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या. मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना मिळाली. क्षीरसागर हे यापूर्वी दोनदा या मतदारसंघातून निवडून आले आले होते शिवाय कोल्हापूर उत्तरा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महायुतीच्या जागा वाटपाच्या फार्मुलानुसार कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेला देण्यात आली. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर निवडून आले. दरम्यान तीन-चार दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक हे मुंबई भेटीत असताना त्यांच्या भाजप नेत्यांच्या सोबत भेटी झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्यासह अन्य नेत्यांच्या सूचनेनुसार कृष्णराज महाडिक यांनी महापालिका निवडणुकीच्या मैदानात पाऊल टाकले आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत.विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कृष्णराज महाडिक हे सक्रिय आहेत. महाडिक कुटुंबीय समाजकारणात राजकारणात सक्रिय आहे. सहकार क्षेत्रातील ते कार्यरत आहेत. कृष्णराजाच्या माध्यमातून महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात सक्रियपणे उतरली. महायुतीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवीत आहेत. अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, " खूप आनंदाचा, उत्साही दिवस आहे कोल्हापूरसाठी चांगले काम करण्याची आमची भूमिका आहे. विरोधकांच्यावर टीका करण्यापेक्षा कोल्हापूर साठी काय करता येईल हे मुद्दे घेऊन आम्ही सामोरे जाणार आहोत. लवकरच आमचा जाहीरनामा आणि त्यागल्याने प्रसिद्ध होईल. गेली तीन-चार वर्षे विविध माध्यमातून मी लोकांच्यामध्ये सक्रिय आहे."