राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात कोल्हापूरच्या तिघी !
schedule08 Sep 24 person by visibility 521 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या एच टू ई पॉवर सिस्टिम्स् महाराष्ट्र राज्य ज्युनियर (एकोणवीस वर्षाखालील) मुला मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा मांगल्य मल्टीपर्पज सभागृह, मेनन बंगल्यासमोर,ताराबाई पार्क कोल्हापूर येथे झाली. मुलींच्या गटात अग्रमानांकित दिव्या पाटील, पाचवी मानांकित दिशा पाटील या जयसिंगपूरच्या जुळ्या बहिणीसह सातवी मानांकित शर्वरी कबनूरकर यांनी अपेक्षित यश मिळवून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. मुलांच्या गटात कोल्हापूरची अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही चौथा मानांकित ऋषिकेश कबनूरकर,सहावा मानांकित आदित्य सावळकर यांच्यासह अभय भोसले,वरद आठल्ये व शौर्य बागडिया यांच्याकडून विशेष अपेक्षित कामगिरी झाली नाही. यापैकी आदित्य सावळकर ला (३९.५) फक्त अर्ध्या गुणांच्या कमी टायब्रेक गुणामुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निवडी पासून वंचित रहावे लागले.
जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीमध्ये मुलांच्या गटात पहिल्या पटावर आघाडीवर असलेल्या द्वितीय मानांकित अहमदनगरच्या आशिष चौधरीने सोळावा मानांकित ठाण्याच्या आयुष काबरा विरुद्ध अजिंक्यपदाची खात्री असलेल्या आशिषने फारसे प्रयास न करता डावात बरोबरी साधत आठ पैकी सात गुण करून अजिंक्यपद पटकाविले. सातवा मानांकित अर्णव कदम (पुणे), पाचवा नामांकित ललितआदित्यअय्यनार भूमीनाथन (पुणे), सोळावं मानांकित आयुष काबरा (ठाणे) सहावा मानांकित आदित्य सावळकर (कोल्हापूर), तृतीय मानांकित अविरत चव्हाण (पुणे) व अग्रमानांकित राम परब (मुंबई) या सहा जणांचे समान सहा गुण झाले होते.बकोल्झ टायब्रेक गुणांनुसार अर्णव कदमला उपविजेतेपद मिळाले. ललितआदित्यअय्यनार भूमीनाथन ला तृतीय स्थान मिळाले तर आयुष काबरा चा चौथा क्रमांक आला. आदित्य सावळकर ला पाचवे, अविरत चव्हाणला सहावे तर राम परबला सातवे स्थान मिळाले. समान साडेपाच गुण झालेले चौदावा मानांकित विक्रमादित्य चव्हाण (सांगली), पंधरावा मानांकित विवान सोनी (कोल्हापूर) व बारावा मानांकित आदित्य चव्हाण (सांगली) यांचा बकोल्झ टायब्रेक गुणांनुसार अनुक्रमे आठवा,नववा व दहावा क्रमांक आला.
मुलींच्या गटात द्वितीय मानांकित पुण्याच्या अनुष्का कुतवलने सहावी मनांची पुण्याच्या राजराजेश्वरी देशमुख ला पराभूत करून आठपैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. अग्रमानांकित कोल्हापूरची दिव्या पाटील,सातवी मानांकित कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर व अकरावी मानांकित ठाण्याची द्रिशा नाईक,या तिघींचे समान सहा गुण झाल्यामुळे बखोल्झ टायब्रेक गुणांनुसार दिव्या पाटील उपविजेती ठरली तर शर्वरी कबनूरकरला तिसरे व द्रिश्या नाईकला चौथे स्थान मिळाले. तृतीय मानांकित सानिया तडवी जळगाव व पाचवी मानांकित दिशा पाटील कोल्हापूर या दोघी साडेपाच गुणासह अनुक्रमे पांचव्या व सहाव्या स्थानी आल्या. पाच गुण मिळालेल्या सहावी मानांकित पुण्याची राजराजेश्वरी देशमुख सातवी, आठवी मानांकित पुण्याची मानसी टिळेकर आठवी, चौदावी मानांकित सांगलीची सारा हरोले नववी तर दहावी मानांकित साताऱ्याची तन्मयी घाटे दहावी आली..
मुले आणि मुलींच्या दोन्ही गटातील वरील पहिल्या दहा क्रमांकांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. मुलांच्या गटात तीस हजार व मुलींचे गटात तीस हजार अशी दोन्ही गटात मिळून एकूण रोख साठ हजार रुपयाची बक्षिसे दिली गेली. दोन्ही गटातील विजेत्यांना रोख सात हजार रुपये व चषक, उप विजेत्यांना रोख चार हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास रोख छत्तीशे व चषक, चौथ्या क्रमांकास रोख तीन हजार रुपये व चषक, पाचव्या क्रमांकास रोख चोवीसशे रुपये, क्रमांक सहा ते दहा प्रत्येकी रोख दोन हजार रुपये देऊन सन्मानित केले.