करवीर निवासिनी अंबाबाई देवींसाठी आता सुवर्ण प्रभावळ, नवरात्रोत्सवापासून प्रभावळ वापरात !
schedule02 Oct 24 person by visibility 707 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीर निवासिनी अंंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ प्रदान करण्यात आली. श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून हा पत्रावळ देण्यात आली. यासाठी ४५ तोळे वजनाचे सोने वापरले आहे. त्याची किंमत जवळपास ३५ लाख आहे. तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवापासून ही प्रभावळ वापरात येणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टतर्फे यापूर्वी देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे. त्यानंतर देवीची सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प करण्यात आला होता. बुधवारी, दोन ऑक्टोबर रोजी हा संकल्प पूर्ण झाला. ८० वर्षापूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर, ट्रस्टतर्फे सोन्याचा मुलामा देण्यात आला. त्यासाठी २४ कॅरेटचे ४५० ग्रॅम म्हणजेच ४५ तोळे सोने वापरण्यात आले. चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्याची कामगिरी गणेश चव्हाण आणि कारागिरांनी पूर्ण केली.
भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या हस्ते आणि महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही सुवर्ण प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. देवस्थान समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला. नवरात्रोत्सवात देवीसाठी ही सेवा करण्याचे भाग्य मिळाले, अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुधले, वसंत पंदरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोने दिले आहे. त्यांचाही सत्कार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. श्री अंबाबाई देवीसाठी सुवर्ण पालखी ट्रस्टच्यावतीने काम करण्याची संधी मिळणे हेच भाग्याचे आहे, असे सांगून, भरत ओसवाल यांनी सुवर्ण प्रभावळबद्दल माहिती दिली. यावेळी महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, रामाराव, महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.