इचलकरंजीत अमित शहांची मोठी घोषणा, कोल्हापूर जिल्ह्यात टेक्सटाइल पार्क उभारणार
schedule08 Nov 24 person by visibility 242 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कापड उद्योगाला चालना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात टेक्सटाइल पार्क उभारू. कापड निर्मितीच्या सगळया प्रक्रिया त्या ठिकाणी होतील ’अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इचलकरंजीत केली. त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडी ही विकास आघाडी नाही तर विनाश आघाडी आहे. त्यांच्याकडे केवळ गांधी, ठाकरे, पवार या तीन परिवाराच्या विकासाचा अजेंडा आहे. अशी जोरदार टीकाही शहा यांनी केली. या सभेत महायुतीचे इचलकरंजीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजीसाठी मोठा प्रकल् मंजूर करावा अशी आग्रही मागणी केली होती.
इचलकरंजी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित केली होती. इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृह चौक येथे सभा झाली. इचलकरंजीतील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे, हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. भाषणात शहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
शहा म्हणाले ‘महाविकास विकास आघाडीचे विकासाशी देणेघेणे नाही. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शरद पवार तुम्ही मंत्री होता, तेंव्हा तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले ? २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित, समृद्ध बनविले आहे. विकासकामांना प्राधान्य दिले आहे. देशाला तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याउलट महाविकास आघाडी ही जातीयवादी राजकारण करत आहेत.
राहुल गांधी, शरद पवार यांच्या महाविकास आघाडीने नेहमीच मतासाठी तुष्टीकरणाचे राजकारण केले. राममंदिराला विरोध करणाऱ्या, ३७० कलम हटविण्याला विरोध करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे आहेत. केवळ मतांसाठी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. त्यांच्याकडे केवळ गांधी, पवार आणि ठाकरे या तीन परिवारांच्या विकासाचा अजेंडा आहे. तर भाजप सरकारकडे भारताच्या विकासाचा अजेंडा आहे.’ असे नमूद केले.
शहा म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारनेुसार आम्ही काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे एकत्रिपतणे महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावरुन पुढे नेत आहेत. हातकणंगले, कोल्हापूर, लोणंद, मिरज, पंढरपूर, पुणे, सांगली, सातारासह २४ रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गतंर्गत सातारा-कागल, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम, वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ, हवाई वाहतूक सेवा या साऱ्या ३२०० रुपये खर्चून महापूर नियंत्रण प्रकल्प होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहिण योजनेंतर्गत २१०० रुपये प्रतिमहिना मिळतील. नागरिकांना दहा लाखापर्यंत वैद्यकीय उपचार मोफत केले जातील. ’
राम मंदिराची निर्मिती, जम्मू काश्मिरमधील ३७० कलम हटविणे या साऱ्या घटनाक्रमांची मांडणी करत शहा म्हणाले, ‘सनातन धर्माला डेंगू, मलेरिया म्हणून हिणवणाऱ्यांना धडा शिकवा. या निवडणुकीत प्रभू रामचंद्राचे अस्तिव नाकारणाऱ्यांना मदत करणार की राम मंदिर उभारणाऱ्या भाजपसोबत हे ठरवायचे आहे. शरद पवार आणि कंपनी ने राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेले नाहीत कारण त्यांना मतांची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नवी शक्ती म्हणून जगभर पुढे येत आहे.”
खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव यांची भाषणे झाली.पक्षाच्या निवडणूक निरीक्षक व माजी मंत्री शशिकला जोल्ले, अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, उत्तम कांबळे यांच्यासह महायुतीच्या नेतेमंडळीची प्रमुख उपस्थिती होती.