कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभ
schedule11 Feb 26 person by visibility 28 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सध्या कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीवरून खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला आणि दोन मार्चपासून सायंकाळच्या सत्रातही कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी विमान सेवा सुरू होत आहे. सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस सायंकाळची कोल्हापूर-मुंबई विमान सेवा असेल, पण लवकरच संपूर्ण आठवडाभर सायंकाळची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या कोल्हापुरातून मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू आहे. खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून दोन मार्चपासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी विमानसेवा सुरू होत आहे. दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंबईतून स्टार एअरवेजचे विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल, आणि पाच वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात येईल. तर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईच्या दिशेने विमानाचे उड्डाण होईल आणि सात वाजून दहा मिनिटांनी हे विमान मुंबईला पोहोचेल. दोन मार्चपासून ही नवी प्रवासी हवाईसेवा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळच्या सत्रातील स्टार एअरवेजचे विमान प्रवासी सेवा देईल. लवकरच आठवड्यातील सातही दिवस सायंकाळच्या सत्रातील कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल, तसेच सायंकाळी साडेचार ऐवजी सायंकाळी सात-साडेसात नंतर मुंबईहून विमान उड्डाण करेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.