काँग्रेसचे तीन धुरंधर… जनमानसात पक्षाचा हात बळकट करणारे शिलेदार
schedule10 Feb 26 person by visibility 14 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा डंका वाजत असताना कोल्हापूर, लातूर आणि सांगली जिल्ह्यात काँग्रेसही भारी ठरली. महायुतीच्या झंझावातासमोर काँग्रेसचे यशही दुमदुमणारे ठरले. हाताला बळकट करणारे हे काँग्रेसचे धुरंधर आपसूकच राज्यभर चर्चेचे ठरले. त्यांनी, पक्षाच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत सारा जिल्हा पिंजून काढला. काँग्रेसची विचारधारा संपलेली नाही…संपणार नाही हे जनमानसात बिंबविले. कार्यकर्त्यांच्यामध्ये आपण विजय मिळवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण केला. महत्वाचं म्हणजे, लोक आजही काँग्रेससोबत आहेत, काँग्रेसचा जनाधार टिकून आहे…हे निकालातून दाखवून दिले. यामुळे जितकी चर्चा सत्ताधाऱ्यांची तितकीच चर्चा या तिघांच्या करिश्म्याची…
काँग्रेसच्या विजयाचे हे शिलेदार आहेत, कोल्हापुरातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, लातूर येथील आमदार अमित देशमुख आणि सांगली जिल्ह्यातील आमदार विश्वजीत कदम. तिघांनाही राजकारण, समाजकारणाचा वारसा लाभलेला. सध्याच्या घडीला तिघेही पक्के राजकारणी. तिघांतही आव्हानांना भिडण्याची ताकत. कार्यकर्त्यांची फौज सोबतीला. तिघातही संघटन कौशल्य…निवडणूक कोणतीही असो, त्यासाठी भरभक्कम यंत्रणा आणि विरोधकांना पुरुन उरण्याची जिगर ठासून भरलेली. तिघांनाही विधीमंडळ कामकाजाचा अनुभव, राज्यमंत्रीपदावर काम केलेले. लोकमानस ओळखण्यात पटाईत. आणि राजकारणाला दिशा देण्याची ताकत. कोल्हापुरात काँग्रेससमोर महायुतीचे प्रचंड मोठे आव्हान. विधानसभा निवडणुकीत तर दहा विरुद्ध शून्य असा सपाटून मार खाणारा पराभव काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या वाटयाला आला. नगरपालिका निवडणुकीतही महायुतीचा वरचष्मा. त्यानंतर निवडणूक झाली महापालिकेची. खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ही निवडणूक लढवली. युवराज मालोजीराजे हे काँग्रेसच्या प्रचारात उतरले. मात्र यशाचे खरे शिलेदार ठरले ते आमदार सतेज पाटीलच. उमेदवार निवडीपासून ते प्रचार यंत्रणेपर्यंत साऱ्यांवर त्यांची पकड. महापालिका निवडणुकीत महायुतीला जशास तसे उत्तर देत काँग्रेसचे ३४ नगरसेवक निवडून आणले. जिल्हा परिषद निवडणुकीतही सतेज पाटील यांनी जिल्हा पिंजून काढला. कुठे पक्षाच्या चिन्हावर तर कुठे आघाडी करत निवडणूक लढविली. १४ सदस्य निवडून आणले. गेल्या सभागृहातही काँग्रेसचे संख्याबळ चौदा इतके होत. मात्र यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे आव्हान मोठे होते. पाटील यांनी एकहाती किल्ला लढवित काँग्रेसची ताकत कमी होऊ दिली नाही.
लातूर म्हटले की चटकन आठवतात, ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी छाप उमटविलेला हा लोकनेता. कोणी काहींही वल्गना केल्या तरी लातूर म्हटलं की विलासराव देशमुख आणि विलासराव देशमुख म्हटलं की लातूर असं पक्कं समीकरण तयार झालेले. ते कधीही न मिटणारे आहे. त्यांच्या स्मृती लातूरवासियांनी मनात कायम जपलेल्या. त्यांच्या समाजकारण व राजकारणाचा वारसा आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख हे नेटाने पुढे चालवित आहेत. अमित देशमुख यांनी महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये काँग्रेसला सत्तास्थानी आणले. वंचित बहुजन आघाडीसोबत युती करुन बेरजेचे राजकारण केले. आता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्वगुण आणखी उजळले. जिल्हा परिषदेच्या गेल्या सभागृहात काँग्रेसची सदस्य संख्या १५ होती. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या संख्याबळात आठ सदस्यांनी वाढ झाली. काँग्रेसचे २३ उमेदवार निवडून आले. ५९ सदस्य संख्या असलेल्या लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेस हा सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष बनला आहे. भाजपला १८ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला १२ जागा मिळाल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची धुरा कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्वाची ठरली होती. नगरपंचायत निवडणुकीत यशाचा झेंडा फडकाविल्यानंतर आमदार कदम यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतही तालुक्यात काँग्रेसचा झेंडा उंचावला. कडेगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. शिवाय कडेगाव पंचायत समितीत आठपैकी सात जागा जिंकत काँग्रेसची एकहाती सत्ता आणली. ‘तुम्ही माझे विश्व, मी तुमचा विश्वजीत…’अशी साद घालत लोकांशी नाळ घट्ट जुळविली. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस ११ ठिकाणी विजयी झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने १८ जागा जिंकल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ६१ आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला सोळा तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सहा तर शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस येथे सत्तेच्या समीप आहेत. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची साथ मिळाली तर सांगलीत सत्तेची गणिते बदलणार आहेत. काँग्रेस एके काँग्रेस हा नारा देत काँग्रेसचे हे धुरंधर महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी ठरले आहेत.