कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!
schedule11 May 26 person by visibility 394 categoryशैक्षणिक
महराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अंतिम मुलाखती चौदा मे २०२६ रोजी होणार आहेत. कुलपती कार्यालयाकडून यासंदर्भात पाच जणांना मेल प्राप्त झाले आहेत. अंतिम मुलाखतीसाठी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, यांची निवड झाली आहेत. याशिवाय नागपूर येथील डॉ. स्मिता देशमुख आणि नांदेड येथील डॉ.ए. एम. महाजन यांचा अंतिम पाच मध्ये समावेश असल्याचे वृत्त आहे. देशमुख व महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. सध्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे तर प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव आहेत. दरम्यान कुलगुरू शोध समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ११५ जणांनी अर्ज दाखल केले. फेब्रुवारी महिन्यात त्या अर्जांची छाननी झाली. त्यातून समितीने २८ उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली आहेत.
कुलगुरुपदासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या २८ उमेदवारांमध्ये मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण, पदार्थ विज्ञान विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. एस. एस. कोळेकर, यांचा समावेश आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. संजय ढोले, डॉ. संजय चाकणे, दिल्ली विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सतीश पाटील, डॉ. ए. एम. महाजन, डॉ. नितीन देसाई, डॉ. विजय खरे, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. राजेश गच्चे, श्रीमती डॉ. बेलनकर,प्रा. डॉ. जोगी, एनआयटीमधील राजेंद्र काकडे यांचा समावेश होता. या साऱ्यांच्या मुलाखती तीन व चार एप्रिल २०२६ रोजी झाल्या होत्या. कुलगुरू शोध समितीने त्यांच्या मुलाखती घेऊन कुलपती कार्यालयाकडे माहिती सादर केली होती. आता कुलपी कार्यालयाकडून पाच जणांना कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी बोलावले आहे. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे तिघे शिवाजी विद्यापीठाशी निगडीत आहेत.