वारणेत रंगणार विभागीय साहित्य संमेलन, चंद्रकुमार नलगेंना जीवनगौरव पुरस्कार
schedule03 Dec 24 person by visibility 27 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणानगर येथे सात व आठ डिसेंबर २०२४ या दरम्यान विभागीय साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, कथाकथन, ग्रंथ पुरस्कार असे विविध कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती डॉ. के. जी. जाधव व राजन मुठाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगरतर्फे विभागीय साहित्य संमेनलाचे आयोजन केले आहे. वारणा शिक्षण संकुलात हे संमेलन होणार आहे. आमदार विनय कोरे हे स्वागताध्यक्ष आहेत. लेखक विश्वास पाटील हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, मसाप कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सुनीता पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या संमेलनातंर्गत २०२२-२३ या वर्षात प्रकाशत साहित्यकृतीमधून काळमेकर लाइव्हचे लेखक बाळासाहेब लबडे (गुहागर) यांना तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार, ‘अंतस्थ हुंकार’चे कवी शिवाजी शिंदे (सोलापूर) यांना सावित्रीअक्का कोरे काव्य पुरस्कार, ‘वसप’चे लेखक महादेव माने (सांगली) यांना शोभाताई कोरे कथा पुरस्कार, ‘परिघाच्या रेषेवर’चे लेखक चंद्रकांत पोतदार (कोल्हापूर) यांना विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार, ‘अंगत पंगत’चे लेखक शिवाजी चाळक (पुणे) यांना मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनाच्या समारोप सत्रात पुरस्कार वितरण समारंभ आहे. पत्रकार परिशदेला चंद्रकांत निकाडे, पी. एस. पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, पी. बी. बंडगर, शिवाजी बोरघाटे आदी उपस्थित होते.