शिक्षण समितीचा डिजीटल प्रयोग : एका तासात स्कॉलरशिप निकाल पालकांच्या मोबाईलवर
schedule06 Jan 26 person by visibility 197 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत कोल्हापूर महानगरपालिकेने संपूर्ण राज्यात एक नवा प्रयोग राबविला. महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आयोजित शहरस्तरीय 'राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षा' अंतर्गत पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी जरग विद्यामंदिर येथे घेण्यात आली. या परीक्षेस शहरातील मनपाचे ६५० विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. या पहिल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल पारंपारिक पद्धतीला फाटा देत अत्याधुनिक मोबाईल अॅपच्या माध्यमातून अवघ्या एका तासात जाहीर करण्यात आला. असा प्रयोग करणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका आहे.
या नाविन्यपूर्ण प्रयोगांतर्गत शिक्षकांनी अॅपच्या साह्याने उत्तरपत्रिका स्कॅन केल्यामुळे मानवी त्रुटी दूर होऊन निकाल अत्यंत पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने तयार झाला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याचा प्रश्ननिहाय निकाल पीडीएफ स्वरूपात पालकांच्या मोबाईलवर पाठवला. यामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती तात्काळ पाहता येत आहे. या तंत्रज्ञानामुळे कोणत्या प्रश्नांची उत्तरे मुलांची जास्त प्रमाणात चुकली आहेत, याचे अचूक विश्लेषण प्रशासनाला मिळाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नेमका कोणता घटक समजलेला नाही हे शिक्षकांना कळणार असून, त्यावर आधारित विशेष मार्गदर्शन करणे अधिक सोपे होणार आहे. हा संपूर्ण उपक्रम कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्म, उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी या आधुनिक परीक्षेचे नेटके नियोजन केले. परीक्षा विभागाचे कामकाज शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, चंद्रकांत कुंभार, संजय शिंदे, परीक्षा केंद्र संचालिका नीता ठोंबरे आणि तंत्रस्नेही शिक्षक सुभाष मराठे, किरण माळी, संदिप जाधव, नेताजी फराकटे, सुशील जाधव व सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
…………….
"तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल त्वरित देऊ शकलो आहोत. कोणता घटक मुलांना कठीण जातोय हे समजल्यामुळे, आता आम्हाला त्यावर अधिक प्रभावीपणे काम करता येईल. हा राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे."
— श्री. डी. सी. कुंभार (प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती, कोल्हापूर मनपा)