कार्यालयीन वेळेत शहर अभियंता गैरहजर, आयुक्तांकडून पगार कपात ! १९ कर्मचाऱ्यांवरही कारवाई! !
schedule27 Nov 25 person by visibility 181 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी, (२७ नोव्हेंबर २०२५) सकाळी १०.३० वाजता मुख्य इमारतीतील विविध विभागांची अचानक तपासणी केली. त्यांनी मुख्य लेखापाल कार्यालय, मुख्य लेखाधिकारी कार्यालय, मुख्य लेखापरीक्षक कार्यालय, रेकॉर्ड विभाग, नगरसचिव विभाग तसेच शहर अभियंता कार्यालयाची तपासणी केली. प्रशासकांनी केलेल्या अचानक पाहणीत अनेक कर्मचारी जागेवर हजर नसल्याचे आढळून आले. या तपासणी दरम्यान शहर अभियंता रमेश मस्कर व वित्त अधिकारी राजश्री पाटील हे कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. तर मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ व नगरसचिव सुनील बिद्रे इतर विभागात उपस्थित होते. तसेच विविध विभागांतील एकूण १९ कर्मचारी तपासणीच्या वेळेस अनुपस्थित होते. या निष्काळजीपणाची गंभीर नोंद घेत प्रशासकांनी संबंधित दोन्ही अधिकारी आणि अनुपस्थित १९ कर्मचाऱ्यांचा अर्धा दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश तात्काळ दिले.या तपासणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत उपस्थित होते. दरम्यान प्रशासकांनी विविध कार्यालयांची तपासणी सुरू केल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. काही विभागात रिकाम्या खुर्चा होत्या. कर्मचारी गैरहजर होते.