कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित
schedule24 Apr 25 person by visibility 54 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महापालिका कर्मचारी संघाने २४ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप स्थगित केला आहे. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी व कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रशासनाने, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मकता दर्शविली. यामुळे संप तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचे कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे व मुख्य संघटक संजय भोसले यांनी कळविले आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘ रिक्त पदे भरणे, ठोक मानधनवरील कर्मचाऱ्यांना कायम करणे व सातव्या वेतन आयोगातील तेरा महिन्याचा फरक हा अतिरिक्त आर्थिक भार निर्माण करणारा आहे. यामुळे याविषयासंबंधी आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेण्याविषयी बैठकीत ठरले. उर्वरित वीस मागण्या २३ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले आहे. यासंबंधीची जबाबदारी उपायुक्त, सहायक आयुक्त व कामगार अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. ’
बैठकीत मागण्यासंबंधी सकारात्मक चर्चा व त्यासंबंधी लेखी स्वरुपात इतिवृत्त गुरुवारी, (२४ एप्रिल ) कर्मचारी संघाकडे प्राप्त झाले. त्यानंतर कर्मचारी संघाने ,बेमुदत संप तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कर्मचारी संघाने ११ एप्रिल रोजी संपाबाबतची नोटीस प्रशासनाला दिली होती.