डेंगी-चिकनगुनियापासून सावधान, कोल्हापुरात ३१ परिसर धोक्याचे !
schedule09 Jul 24 person by visibility 318 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डेंगी आणि चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ३१ ठिकाणे धोकादायक जाहीर केल आहेत. या भागात तपासणीबरोबरच सफाईवर अधिक लक्ष केंद्रित केले. धूर, फवारणी केली जात आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातंर्गत हा सर्व्हे केला आहे. जून महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दहा आरोग्य केंद्राने केलेल्या सर्व्हेत आढळलेल्या रुग्णांवरुन संबंधित परिसर धोकादायक जाहीर केले आहेत. यामध्ये जोशीनगर, पांजरपोळ, दौलतनगर, शिवाजी पेठ, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, कसबा बावडा, लाइनबाजार, कनाननगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, सुभाषनगर, यादवनगर, बालाजी पार्क, रामानंदनगर, राजेंद्रनगर, वर्षानगर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, सदरबाजार , विचारेमाळ, भोसलेवाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, सिद्धार्थनगर, सीपीआर, रमणमळा, बुधवार पेठ, मोरे-मानेनगर, साळोखेनगर हे परिसर धोकादायक म्हणून निश्चित केले आहेत. जून महिन्यात शहरात ४९ डेंगीचे रुग्ण आढळले होते. तर जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यातच तेरा रुग्ण आढळले आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील पाणी साचणारी भांडी रिकामी करावीत, कुंडी, फ्रीज, टेरेसवर पडलेले साहित्य, खराब टायरमधील पाणी काढावे. अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य विभागाने डास, अळयांच्या तपासणीसह सफाईवर लक्ष केंद्रित केले आहे.