कोल्हापूर उत्तर-दक्षिणमध्ये बॅनरबाजी ! वारं फिरलयंला.... हरलो म्हणून मैदान सोडलो नाहीद्वारे उत्तर !!
schedule29 Nov 24 person by visibility 318 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये निकालानंतर आता बॅनरबाजी पाहावयास मिळत आहे. विजेते उमेदवारांचे समर्थक आणि पराभूत उमेदवारांचे समर्थकांतील बॅनरबाजीतही आगामी काळातील राजकीय संघर्षाची झलक उमटत आहे.
महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाली. कोल्हापूर जिल्हाही अपवाद राहिला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागांवर फटका बसला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचा कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात वरचष्मा असायचा. यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. काँग्रेसवर बॅकफूट गेल्यासारखे चित्र असताना गेले दोन दिवस कोल्हापूर शहर आणि दक्षिण मतदारसंघात आमदार सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी लक्षवेधी ठरली आहे. आमदार पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फोटोसह उभारलेल्या बॅनरवर ‘निष्ठेशी कधीच तडजोड नाही, कायम तुमच्यासोबत’अशी ग्वाही दिली आहे.
‘हरलो म्हणून मैदान सोडले नाही, गुलालाचाच विषय आहे न्वहं थोडं दिवस थांबा घरपोच होईल’यामधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उत्तर देण्याच्या पावित्र्यात समर्थक दिसत आहेत. ‘इतरांनी आमची काळजी करू, आमचं निस्तरायला आम्ही घट्ट आहोत’ अशा मजकुराचे फलक लक्षवेधी ठरत आहेत. कसबा बावडा हा तर आमदार पाटील यांचा बालेकिल्ला. मात्र या ठिकाणीही यंदा काँग्रेसला अपेक्षित मताधिक्क्य मिळाले नाही. महायुतीचे कोल्हापूर उत्तरमधील विजयी उमेदवार व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विजयाचे फलक शहरभर झळकले आहेत. कसबा बावडा येथेही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर उभारले आहेत. कोल्हापूरचं उत्तर एकच राजेश क्षीरसागर, कोल्हापूरचं भगवं उत्तर’असे फलक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उभारले आहेत.
दुसरीकडे कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधील पराभव हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये तर पक्षापेक्षा गटातटाची लढत. दक्षिण मतदारसंघातील मोठया गावात भाजपला आघाडी मिळाली. गांधीनगरमध्ये २९०० मतांची, पाचगावमध्ये २६०० मतांची आघाडी आमदार अमल महाडिक यांना मिळाली आहे. भाजप व महाडिक समर्थकांनी विजयाचे ठिकठिकाणी फलक लावले आहेत.
महाडिक समर्थकांनी ‘दक्षिणेत वारं फिरलयं, पाचगावमध्ये वारं फिरवलय’ अशा मजुकराचे फलक उभारले आहेत. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या समर्थकांनी, ‘पडत्या काळात साथ सोडणारी आमची औलाद नाही, सदैव तुमच्यासोबत काल पण आज पण उद्या पण…’अशा मजकुराचे फलक ठिकठिकाणी दिसत आहेत. दरम्यान दक्षिणमधील अनेक गावात आमदार पाटील गटाची सत्ता असताना मतदारसंघातील पिछाडीला जबाबदार कोण ? अशी चर्चा होऊ लागली आहे.