पैलवानांच्या हाकेला अमल महाडिक धावले, मैदानासाठी दिला खुराक, शाहू खासबाग मैदानाला नवसंजीवनी !
schedule01 Dec 25 person by visibility 55 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खुराक हा केवळ पैलवानासाठी नसतो, तर लाल मातीच्या आखाडयाला त्याची गरज असते. मैदान कुस्तीसाठी अद्ययावत राहावे म्हणून लाल मातीची मशागत अत्यावश्यक असते. यासाठी पैलवनांनी आमदार अमल महाडिक यांना सहकार्य करण्याची मागण्याची मागणी केली होती. पैलवानांच्या विनंतीला मान देत आखाडा बनविण्यासाठी लागणारा खुराक महाडिक यांनी पुरविला. त्या माध्यमातून शाहू खासबाग मैदानाला नवसंजीवनी मिळाली.
आमदार महाडिक यांनी आखाडा बनवण्यासाठी १० पोती हळद, १० डबे सरकी तेल, १० पोती लिंबू, २० किलो कापूर, २ पोती काव, ५० लिटर दूध असा खुराक स्वखर्चातून पैलवानांकडे सुपूर्द केला. राजर्षी शाहू विजयी गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हारुगले, पैलवान माऊली जमदाडे यांच्यासह गंगावेश तालमीच्या ५० हून अधिक पैलवानांनी खासबाग मैदानामध्ये आखाडा तयार करण्यास सुरुवात केली.
सोमवारी दुपारी चार वाजता वस्तादांच्या हस्ते आखाडा पूजन करून माती उकरण्यास सुरुवात झाली. संपूर्ण आखाडा खोदून झाल्यानंतर या आखाड्यामध्ये हळद मिसळण्यात आली. त्यानंतर पाणी शिंपडून झाल्यावर सर्वत्र कापूर पसरण्यात आला. कापलेली दहा पोती लिंबे आखाड्यात सर्वत्र टाकण्यात आली. यानंतर आणलेली काव सर्वत्र शिंपडून झाल्यावर १० डबे सरकी तेल संपूर्ण आखाड्यात शिंपडण्यात आले. यानंतर सर्वत्र दूधही शिंपडण्यात आले. तयार झालेले हे मिश्रण काही काळ तसेच ठेवून त्यानंतर पुन्हा आखाडा उकरण्यास पैलवानांनी सुरुवात केली. संपूर्ण आखाड्यातील माती दोन-तीन वेळा वर-खाली करून खुराक एकजीव करण्यात आला. पुढील चार दिवस रोज सकाळी हा आखाडा उकरण्यात येणार असून त्यानंतर सरावासाठी हा आखाडा तयार होईल असे वस्ताद विश्वास हारुगले यांनी सांगितले.
हे काम लवकर होण्यासाठी रोटावेटरची आवश्यकता आहे. ही गरज बोलून दाखवताच आमदार महाडिक यांनी रोटावेटर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पैलवारांना सरावासाठी असणारी आखाड्याची आवश्यकता ओळखून स्वखर्चातून खुराक उपलब्ध करून दिल्याबद्दल पैलवान माऊली जमदाडे यांनी आमदार महाडिक आणि महाडिक परिवाराचे आभार मानले. भविष्यात कोल्हापूरच्या राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आणि कुस्तीच्या इतिहासातील कोल्हापूरचे स्थान सदैव उच्च राहण्यासाठी नेहमीच पुढाकार घेईन असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी दिला. नुकतेच महाडिक यांनी खासबाग मैदानाला भेट देऊन सरावासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिले होते.