अक्षयकुमारची कोटीची मदत, केडीएमजीचा पुढाकार ! कुरुंदवाडला उभारणार कन्या शाळा !!
schedule14 Oct 25 person by visibility 64 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमारने केलेली एक कोटी रुपयांची मदत, कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपचा (केडीएमजी) पुढाकार या माध्यमातून कुरुंदवाड येथे कन्या शाळेची इमारत साकारणार आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) दुपारी चार वाजता पायाभरणी समारंभ आहे. २०१९ च्या महापुरात या शाळेची इमारत जमीनदोस्त झाली होती. येत्या दीड वर्षात कन्या शाळेची इमारत साकारणार आहे अशी माहिती केडीएमजीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केडीएमजीचे ललित संघवी, सुजय होसमणी, डॉ. शीतल पाटील, रविकिशोर माने, उत्तम फराकटे, अॅड. राजेंद्र किंकर, प्रकाश मेहता, धनंजय दुग्गे यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली. २०१९ मधील महापुराची आपत्ती दरम्यान नागरिकांना मदत करण्यासाठी केडीएमजीची स्थापना झाली. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी केडीएमजीने कार्य केले. कुरुंवाड येथील सानेगुरुजी शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेची इमारत महापुराच्या कालावधीत जमीनदोस्त झाली. ही इमारत पुन्हा बांधण्याचे ठरले.
दरम्यान केडीएमजीच्या सेवाकार्याची दखल घेऊन अभिनेता अक्षयकुमारने शाळेच्या इमारतीसाठी एक कोटी रुपयांची मदत केडीएमजीकडे केली. अक्षयकुमार यांच्या आई, ’कै. अरुणा हरिओम भाटिया’ या नावांनी शाळेची इमारत होणार आहे. सुमारे दहा हजार चौरस फूट बांधकाम आहे. दहा खोल्या बांधण्यात येणार आहेत. शाळा इमारतीसाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, कारखानदारांनी शाळेसाठी मदत करावी. वस्तूरुपातही मदत स्विकारली जाते. येत्म्या दीड वर्षाच्या कालाधीत ही इमारत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.