प्रयोगशाळा सहायक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन
schedule26 Nov 24 person by visibility 122 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष २०२३-२४च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक संघ ,कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केले होते. या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ एकनाथ आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखालीं उपशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी,अधीक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांनी कामकाज पूर्ण केले.
दहा ऑक्टोबर २०२४ रोजी रोजी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेतर अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजनचे नियोजित केले होते. परंतु हायकोर्टाकडील प्रयोगशाळा सहायक पदासाठी दाखल याचिका तसेच संघटनेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना केलेली विनंती याचा विचार करून विधानसभा निवडणूक कामकाज पूर्ण होईपर्यंत प्रयोगशाळा सहायक समायोजन कामकाजास तात्पुरती स्थगिती दिली होती.
आचारसंहिता संपुष्टात आल्याने खाजगी अनुदानित शाळाकडील सोळा व अल्पसंख्यांक खाजगी अनुदानित शाळेकडील पाच असे एकूण १९ प्रयोगशाळा सहाय्यक यांचे समायोजनाचे नियोजन केले होते. प्रयोगशाळा सहाय्यक यांची रिक्त पदांची यादी एकूण २० पदांमधील ९ पदे प्रस्तावित पदे असल्याने सदर ठिकाणी समायोजनाकरिता मागणी करता येणार नसल्याने केवळ ११ पदे रिक्त होती. तसेच अल्पसंख्यांक अनुदानित शाळेतील रिक्त पदांवर अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी हजर करून घेण्याबाबत संस्था व शाळा यांना शासन नियमाप्रमाणे स्वातंत्र्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
सेवा जेष्ठता क्रमांकानुसार अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी यांचे समुपदेशनाने त्यांनी निवड केलेल्या शाळेत त्यांचे समायोजन करण्यात आले. या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. समायोजन प्रक्रियेमध्ये खाजगी अनुदानित शाळा कडील आठ प्रयोगशाळा सहाय्यक व अल्पसंख्यांक संस्थेतील एक प्रयोगशाळा सहाय्यकाचे समायोजन केले. तसेच उर्वरित आठ प्रयोगशाळा सहाय्यकांचीं नावे शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर यांच्याकडे विभाग स्तरावर समायोजन प्रक्रियेसाठी कळविण्यात येणार आहे.