शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी भली मोठी रांग ! कुलगुरू. आजी-माजी प्रकुलगुरु, अधिष्ठातांचा समावेश ! !
schedule31 Jan 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्थेतील तब्बल ११५ जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्रकुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. आर. व्ही. गुरव, माजी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाातील प्रोफेसरांचे पाच अर्ज आहेत. याशिवाय विविध अधिविभागाच्या प्रमुखांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केला आहे. मुंबईतील काही प्रोफेसरांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अर्ज भरला आहे. शिवाजी विद्यापीठ कॅम्पसमधील चौदा जण कुलगुरुपदासाठी तयारी करत आहेत.
शिवाजी विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुदाचा अतिरिक्त कार्यभार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे सोपविला आहे. दरम्यान सध्या कुलगुरु निवड प्रक्रिया सुरू आहे. कुलगुरू शोध समितीकडे१ १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. संबंधितांनी स्वतची माहिती हार्ड आणि सॉफ्ट कॉपीमध्ये दिली आहे. नोडल ऑफिसर म्हणून प्रा. एस सरनवन काम पाहत आहेत.
कुलगुरुपदासाठी अर्ज दाखल केलेल्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण, डॉ. सागर डेळेकर, डॉ. एस. एस. कोळेकर, डॉ. के. एम. गरडकर, डॉ. अनिल घुले, जी. बी. कोळेकर, डॉ. आर. जी. सोनकवडे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. गुरव, अर्थशास्त्र विभागातील डॉ. एम. एस. देशमुख, प्रो. डॉ. ज्ञानदेव तळुले, वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाच्या डॉ. निशा मुडे पवार, प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाचे डॉ. रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. अन्य विद्यापीठातील इच्छुकांमध्ये डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे डॉ. आर. के. कामत, माजी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचे अर्ज आहेत. कामत व नांदवडेकर यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठात विविध पदावर काम केले आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील डॉ. नितीन देसाई यांचा अर्ज आहे.
कुलगुरु शोध समितीकडून आता प्राप्त अर्जांची छाननी होईल. त्यातून २५ उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट होतील. त्यामधील पाच उमेदवारांची नावे कुलपती कार्यालयाकडे सादर होतात. कुलपतींमार्फत त्या पाच जणांची मुलाखत घेतली जाते. अंतिमता कुलगुरुपदासाठी नाव घोषित होते. साधारणपणे मार्च २०२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळण्याची चिन्हे आहेत.