३०० गर्भपात, माजी सिव्हिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड ! !
schedule30 Jul 26 person by visibility 224 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील कदमवाडी येथील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करत असताना पोलिस व आरोग्य विभागाने धाड टाकली. बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार या डॉक्टरांनी ३०० गर्भपात केल्याची माहिती पुढे येत असल्याचे वृत्त आहे. बेकायदेशीर गर्भपाताचे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून त्यादिशेने तपास सुरू आहे. डॉ. गायकवाड यांनी सिव्हिल सर्जन पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड येथे सिव्हील सर्जन म्हणून काम केले आहे. शिवाय गायकवाड हे सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे अतिरिक्त अधीक्षक व पुण्यात सहाय्यक संचालकपदावर होते.
पोलिस व आरोग्य विभागाच्या या संयुक्त कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठीची औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. जिल्ह्यात गेले काही दिवस अवैध गर्भपात प्रकरणे गाजत आहेत. नुकतेच कळंबा येथे छापा टाकला होता. त्यावेळी डॉक्टरांनी तेथून पलायन केले होते. दरम्यान या साऱ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध गर्भलिंग निदानाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत होती. गुरुवारी, पोलिसांनी डमी रुग्णाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावलला. नियमित वैद्यकीय नोंदणी न करता संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
त्या ठिकाणी गर्भपाताची प्रक्रियेच्या हालचाली सुरू होताच उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पंचायत समिती करवीरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्यासह गुन्हे शोध पथकाने हॉस्पिटलवर छापा टाकला. याप्रकरणी डॉ. गायकवाड यांना ताब्यात घेतले. गायकवाड यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असताना प्रकृती बिघडली. यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले.