प्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. अरुण पाटील, प्रा. गजानन माळी यांना राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार
schedule02 Sep 26 person by visibility 38 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे २०२४ -२५ व २०२५- २६ या वर्षाचे ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’घोषित केले आहेत. येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षकिदनाचे औचित्य साधून हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय निवड समितीतर्फे हे पुरस्कारासाठी निवड होते. रोख पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार यांनी पुरस्कारांची घोषणा केली आहे. राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्राचार्य व प्राध्याकांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार दिले जातात. दरवर्षी ३१ पुरस्कार दिले जातात.
दरम्यान, २०२४ -२५ या वर्षाकरिता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यादीमध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातंर्गत प्राचार्य संवर्गातून सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गोविंदराव कणसे यांना जाहीर झाला आहे. डॉ. कणसे हे १९८७ मध्ये भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. जवळपास वीस वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.ते, रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.२००६ मध्ये त्यांची, ‘मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव’ येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभा व विद्या परिषदेवर काम केले आहे. डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षक संवर्गातून येथील महावीर महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरुण आण्णासाहेब पाटील यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. पाटील हे गेली २१ वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहेत. ते, भूगोल विषयाचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थी व महाविद्यालयाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.भूगोल परिषदांचे आयोजन केले आहे. विविध परिषदेत संशोधन पेपर सादर केले आहेत.
२०२५- २६ या वर्षाकरिता शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातर्गत प्राचार्य संवर्गातून ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील स.ब. खाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश राजाराम तथा आर. आर. कुंभार यांना जाहीर झाला आहे. कुंभार यांनी यापूर्वी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत काम केले आहे. कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजचे ते प्राचार्य होते. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम केले आहे. तर शिक्षक संवर्गातील ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा.डॉ. गजानन विष्णू माळी यांना घोषित झाला आहे. डॉ. माळी यांनी, २००९ मध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. ते सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथेही प्राध्यापक म्हणून काम केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.