+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule05 Jul 21 person by visibility 1642 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
 ‘महाराष्ट्र न्यूज 1 : कॉम’ या न्यूज पोर्टलचा आज वर्धापनदिन. न्यूज पोर्टलची सुरुवात करुन आज बरोबर वर्ष होत आहे. वर्षभराचा कालावधी हा आमच्यादृष्टीने आव्हानात्मक होता. कोरोना स्थिती, नवीन माध्यम यामुळे कितपत यशस्वी होवू ही शंका मनात होती. पत्रकारितेचा अनुभव होता. मुद्रित माध्यमात काम केले होते. मात्र डिजीटल माध्यम तसे नवीन. सध्याचा जमाना हा गतीमान. प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन. बसल्या ठिकाणी एका क्लिकवर जगभरातील माहिती, घटना समजून येतात. यामुळे वाचकांना अचूक आणि जलदगतीने बातमी उपलब्ध करुन देणं हे एका अर्थी कसोटी होती. कमी वेळेत बातमी देत असताना ती योग्यच द्यायची हे आम्ही कसोशीने पाळले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत आम्ही हा प्रयत्न शंभर टक्के केला.
विशेषकरुन कोल्हापूर शहर, जिल्ह्याशी निगडीत वार्तांकन करताना कधीही दिशाभूल करणारी, अर्धसत्य बातमी प्रसिद्ध केली नाही. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, क्रीडा…अशा समाजमन जोडलेल्या हर एक घटकाशी निगडीत वृत्ताकंन करताना ‘महाराष्ट्र न्यूज 1.कॉम’ने विश्वासार्हता जपली, बातमीतील अचूकपणा टिपला. समतोलपणा राखला. कोणाच्या आहारी न जाता तटस्थपणे लिखाण केले. यामुळे बारा महिन्याच्या कालावधीत प्रत्येक दिवशी वाचकांचा आम्हाला जोरदार प्रतिसाद मिळाला. आम्ही मांडलेले अनेक विषय चर्चेचे ठरले. प्रशासनाने दखल घेतली. राज्यकर्त्यांनी लक्ष घातलं.
उदाहरणार्थ, प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाचा विषय. ‘दोन मंत्र्यांच्या महापालिकेतील प्राथमिक शिक्षक वेतन आयोगाविना’ ही बातमी सकाळी प्रसिद्ध केली आणि महापालिका प्रशासनाने सायंकाळी बैठक घेऊन वेतन आयोग लागू करण्याच्या पत्रावर सही करुन त्याची पोच शिक्षकांना दिली. ‘वर्षभर विनासुट्टी, नाव मल्लिनाथ कलशेट्टी’, ‘नातं मैत्रीच, राजकारणापलीकडचं’, ‘बरसणारा पाऊस, लढणारा युवराज’अशा कितीतरी बातम्या वाचक मनाला स्पर्शून गेल्या.
वर्षभराच्या कालावधीत कोल्हापूर शहराचे विविध विषय हाताळले. सामाजिक प्रश्नांची मांडणी केली. शिक्षण क्षेत्रातील समस्या मांडल्या. राजकीय, सहकार आणि औद्योगिक जगतातील घडामोडीवर वस्तुनिष्ठ लिखाण केले. गोकुळची निवडणूक, कुलगुरु निवड प्रक्रिया, कोरोना कालावधीतील सरकारी धोरणे, वैद्यकीय उपचार, नागरिकांना आवश्यक सुविधा, काही वेळेला उपचाराअभावी नागरिकांना झालेला त्रास या साऱ्या घटनांचा अचूकपणे वेध घेतला. यामुळे वर्षभराच्या कालावधीतच ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम’ने लोकांचा विश्वास संपादन केला. या कालावधीत सहा लाख २५ हजार व्हिजिटर्सचा टप्पा पूर्ण झाला. हे सारं शक्य झालं, ते वाचकांच्या पाठबळामुळे. जाहिरातदारांच्या सहकार्यामुळे. वर्षभराच्या कालावधीत अनेकांनी वेगवेगळया माध्यमातून मदत केली. वर्षभराचा टप्पा हा अनुभवात भर घालणारा, आणखी प्रगल्भ बनविणारा ठरला. याकामी पत्रकार सतीश घाटगे यांचे मोलाचे सहकार्य आहे. प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, पत्रकार गुरुबाळ माळी यांच्यासह माळी परिवाराचे प्रोत्साहन आहे. कुटुंबीयाचे सहकार्य आहे. पत्नी रोहिणी माळी यांची मोलाची साथ आहे. असंख्य मित्रांची सोबत आहे. आतापर्यंत आपल्या साऱ्यांचे सहकार्य लाभले, भविष्यातही हा लोभ, सहकार्य कायम राहील ही खात्री आहे !