Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सर, तुम्ही सुद्धा...!निवडणुकीपूर्वी ठरावधारकांची सहल, निकालानंतर संचालकांची टूर ! दोन्ही आघाडयांकडून नियोजन !!इकोबाजार, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शनमतदानाचा टक्का वाढला ! शिक्षकसाठी ८५.८७ टक्के, पदवीधरसाठी ६२.७८ टक्के !! नवीन आमदार कोण ?सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलशिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूरला भेट देणार, युवराज संभाजीराजेंच्यासमोर केली ईच्छा व्यक्तकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवडशिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढा

जाहिरात

 

सर, तुम्ही सुद्धा...!

schedule24 Oct 26 person by visibility 259 categoryसामाजिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन -: शिक्षित मतदारांचे मतदारसंघ म्हणून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ. या दोन्ही घटकांचे विषय विधीमंडळात प्रभावीपणे मांडायला हवेत यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून आमदार निवडले जातात. पुणे विभागीय मतदारसंघात यंदा शिक्षक मतदारसंघात उच्चांकी मतदान झाले. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचे आरोप, प्रत्यारोप, शिक्षकांसाठी केलेली कामे यापेक्षा ही निवडणूक गाजली ती शेवटच्या काही दिवसात झालेल्या ‘लक्ष्मीदर्शनाच्या खेळाने…’ या दोन्ही मतदारसंघातील अनेक मतदारांना काही जणांनी लक्ष्मीदर्शन घडविले असे आरोप झाले. मत विक्रीच्या प्रकरणावर समाजमनातून ‘सर तुम्ही सुद्धा…’अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘एक हजार, दोन हजार, तीन हजार रुपयापासून दहा हजार रुपयांपर्यंत’नोटा मोजले अशी उघड चर्चा झाली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर आता सर्वाधिक चर्चा पैसे वाटपाच्या प्रकाराची सुरू झाली आहे. शिक्षक आणि पदवीधरमधील मतदार हे सुशिक्षित…सुजाण…पण या दोन्ही मतदारसंघातील काही मंडळींनी मतासाठी नोटा मोजल्या…हे साऱ्यात धक्कादायक. पैसे घेऊन मत देण्याची वाईट पद्धत यानिमित्ताने या मतदारसंघात घडली. यावरुन शिक्षित मंडळींची किती घसरण होऊ लागलीय याकडे अंगुलीनिर्देश केले जात आहे. शिक्षक मतदारसंघातील सगळे मतदार हे  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक असतात. ज्यांनी नोंदणी केली त्यांना मतदानाचा अधिकार असतो तर पदवीधर मतदारसंघातील सगळे मतदार झालेले... जे पदवीधर आहेत आणि मतदार नोंदणी केले आहे ते मतदानास पात्र असतात.

वास्तविक या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीत पूर्वी विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांचा वरचष्मा असायचा. संघटनेच्या पातळीवर मतदार नोंदणी व्हायची. उमेदवार कोण ? हे संघटनेच्या ताकतीवर ठरायचे. मात्र यंदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीत ना विद्यार्थी संघटनांचा प्रभाव दिसला ना शिक्षक संघटनांची ताकत. सगळी सूत्रे राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या हाती एकवटली. यामुळे उमेदवार निवडीपासून ते प्रचार यंत्रणेपर्यंत सगळीकडे राजकीय पक्ष आणि नेतेमंडळीच. राजकीय पक्ष आणि नेते मंडळी म्हटली की, ‘निवडणूक जिंकण्यासाठी सारे काही…’हे सूत्र ठरलेलं. शिक्षक आणि पदवीधरमधील अधिकाधिक मतदार कॅश करण्यासाठी लक्ष्मीदर्शनाचा खेळ झाला. मत विकत घेणाऱ्यांना ना काही देणे घेणे, ना मतदान करणाऱ्यांना कोणत्या गोष्टीचा पश्चाताप.

खरं तर, उदात्त भावनेने  शिक्षण क्षेत्राची सेेवा करणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी नाही. सस्कारशील शिकवण देणारे शिक्षकही खूप आहेत. मात्र पदवीधर व शिक्षक मतदारसंघात यंदा पैशाचा खुलेआम वाटप झाले. पैसे वाटपात पुढाकार असलेले काही उमेदवार तर मी स्वत शिक्षक असल्याचे निवडणुकीत डांगोरा पिटत होते. तर पदवीधरमधील उमेदवारांच्या बाता तर खूप मोठया होत्या. मात्र पडद्यामागील राजकारण वेगळेच होते. शिवाय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील या चुकीच्या पायंडयाला ना कोणत्या शिक्षक संघटनेने विरोध केला...ना कोणती विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरली. गेल्या काही वर्षात विद्यार्थी संघटना या अस्तित्व शूनय झाल्या आहेत. विद्यार्थी संघटनांना स्वतची अशी भूमिका राहिली नाही. ते राजकीय पक्ष व नेते मंडळीच्या हातातील बाहुले बनलेत असे चित्र दिसत आहे.

दरम्यान,  सगळेच मतदार काही पैशाला विकले नाहीत. तसेच सगळयाच उमेदवारांनी काही मते विकत घेतली नाहीत..मात्र काही उमेदवार व मतदारांच्या गैरकृत्यामळे ‘शिक्षक-पदवीधर’कडे पाहण्याची संशयाची दृष्टी निर्माण झाली. आजपर्यंत पैसे घेऊन मत करणारे ठराविक वर्ग अशी ओरड व्हायची. त्या यादीमध्ये आता पदवीधर आणि शिक्षकही ओढले. खरं तर निवडणुकीत चांगला पायंडा पाडण्याची भूमिका या वर्गाने घ्यायला हवी होती. ‘मी माझे मत विकणार नाही…’असा पवित्रा घ्यायला हवा होता. ‘जो पैसे देईल…त्याला मत नाही’अशी रोखठोक भूमिका शिक्षक व पदवीधर मतदारांनी घेतली असती तर दोघांच्या पेशांचा रुबाव वाढला असता…‘सर तुम्ही सुद्धा…’अशी म्हणायची वेळ समाजावर आली नसती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes