शाहू महाराज आदर्श व्यक्तिमत्व, त्यांनी निवडणुकीस उभं राहू नये- हसन मुश्रीफ
schedule29 Feb 24 person by visibility 306 categoryराजकीय
राजकारणात यावं की नाही हा शाहू महाराजांचा व्यक्तिगत प्रश्न
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी राजकारणात यावं की नाही हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र ते, साऱ्यांसाठी आदर्श आहेत. आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांनी निवडणुकीस उभे राहू नये.’ असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुश्रीफ यांनी, महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू असे सांगितले.
सध्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे महायुतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झाली नाही. महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मंडलिक यांनी मतदारांशी संपर्क सुरू केला आहे.
पालकमंत्री मुश्रीफ हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे यासंबंधी मुश्रीफ यांना विचारला असते, श्रीमंत शाहू महाराज हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी निवडणुकीपासून लांब राहावे असे वाटते. पण त्यांनी राजकारणात यावे की नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तेच जर राजकारणात येत असतील तर यापुढे लोक ठरवतील असे मत त्यांनी व्यक्त केले. कोल्हापुरातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यताही मुश्रीफ यांनी बोलून दाखविली.