दहा हजाराची लाच घेताना पोलिसाला अटक
schedule17 Jan 22 person by visibility 496 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर:
बांधकाम व्यावसायिकांकडून दहा हजाराची लाच मागणाऱ्या लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिग्विजय मर्दाने असे लाच मागणाऱ्या पोलिसाचे नाव आहे.
पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. तक्रारदार धीरज अनिल साखळकर (वय ३७, रा. नागाळा पार्क) हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल मर्दाने याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली असून २५ हजार रुपये लाच स्वीकारली आहे. बांधकाम व्यावसायिक साखळकर यांनी पोलिस कर्मचारी मर्दाने २५ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी पडताळणी केली. त्यामध्ये मर्दाने याने तक्रारदार साखळकर यांच्याकडून २५ हजाराची लाच स्वीकारल्याचे मान्य करुन आणखीन दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस कॉन्स्टेबल मर्दाने यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिस उप अधीक्षक अदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, मयूर देसाई, संदीप पडवळ, रुपेश माने यांनी कारवाईत भाग घेतला.