महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गावागावातून आलेले हजारो लोक, त्यांचा मिरवणुकीतील उत्साही सहभाग, महिलांची लक्षणीय उपस्थिती, लक्ष वेधून घेणारे बाल वारकरी भजनी मंडळ, झांज पथक हलगी पथकाचा कडकडाट आणि जल्लोषी माहोल अशा वातावरणात कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (२८ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला.
कागल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले व सहाय्यक निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांच्याकडे अर्ज दाखल केला. सकाळी सहा वाजताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलचे ग्रामदैवत गहिनीनाथांचे दर्शन घेऊन तिथेच उमेदवारी अर्जावर सह्या केल्या. त्यानंतर श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर, साई मंदिर, लक्ष्मी मंदिर या कागल शहरातील देवतांचे दर्शन घेतले. मंत्री मुश्रीफ यांचे मतदान नोंद असलेले लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर व नंतर आप्पाचीवाडी येथील श्री. हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले.
दरम्यान अर्ज भरण्याच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत ‘ यंदा सिक्स साहेब फिक्स, अंदाज पावसा पाण्याचा करायचा, मुश्रीफांचा नाही..!, कसा आहे थप्पा... करशील काय नाद परत..!, यावेळी सिक्स स्टेडियमच्या बाहेर पडली बघ, काल आज आणि उद्याही, नेहमी तुमच्या सोबत, * जनतेला उत्तर द्या, अडीचशे कोटी कर्जाचे केलं काय ?, जनतेचा सेवेकरी विधानसभेचा मानकरी’अशा मजकुराचे फलक लक्ष वेधून घेत होते.
झेंड्यांनी आणि बॅनरनी सजवलेल्या ट्राॅलीतून मंत्री मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळ संचालक अमरीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रचंड संख्येने जमलेल्या गर्दीत महिला आणि वृद्ध महिलांचाही सहभाग लक्षवेधी होता. सकाळी ११ वाजता कागल बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून गैबी चौक मार्गे मिरवणुकीने निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात सभेचे आयोजन केले होते. भर उन्हाच्या तडाख्यात अलोट गर्दीत सभा झाली.
.............
“ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकगंगेला आलेल्या या महापूरापुढे मी नतमस्तक होऊन, साष्टांग दंडवत घालीत आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती आता मला आली आहे. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे हे ॠण या जन्मीच काय, सात जन्मीही फेडू शकत नाही. सहाव्यांदा आमदारकीची संधी द्या, संपूर्ण आयुष्य जनतेचा हमाल बनून सेवा करू.”
- हसन मुश्रीफ, कागल महायुतीचे उमेदवार