महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेचे विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्या प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. राज्य नियोजन म्ंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरमधील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागरही ही गुरुवारी सकाळी मुंबईला रवाना झाले.
गुरुवारी, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत मुंबईत प्रवेश होणार आहे. त्या, क्षीरसागर यांना पाठिंबा देणार आहेत. आमदार जाधव यांनी काँग्रेसकडून विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र त्यांची उमेदवारी डावलली होती. काँग्रेसकडून पहिल्यांदा राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या ३० नगरसेवकांनी विरोध केला. यामुळे लाटकर यांची उमेदवारी बदलून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी मिळाली.
मधुरिमाराजे छत्रपती यांनी २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी विद्यमान आमदार जयश्री जाधव अनुपस्थित होत्या. यावरुन त्यांची नाराजी दिसून येत होती. जाधव या २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये त्या विजयी झाल्या होत्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसकडे मुलाखत दिली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीचा पत्ता काँग्रेसकडून कापला गेला. मात्र या घडामोडीवर त्यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोल्हापुरात काँग्रेसला धक्का बसणार आहे.