गोकुळची उत्पादने सौंदत्ती यात्रेसाठी रवाना
schedule01 Dec 25 person by visibility 8 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: श्री रेणुकादेवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जातात. यात्रेदरम्यान नैवेद्य, धार्मिक विधी तसेच चहापानासाठी दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता लक्षात घेऊन गोकुळ दूध संघाकडून या वर्षीही सौंदत्ती येथे उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांनी भरलेली वाहने कोल्हापूरातून सौंदत्तीच्या दिशेने रवाना झाली. ओढ्यावरील रेणुका मंदिर येथे या गाडीचे पूजन गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आले.
सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून गोकुळ दूध संघ यात्रेदरम्यान उच्च दर्जाचे, ताजे व सुरक्षित दूध आणि दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करून देत असून भाविकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यंदाही, भाविकांच्या सेवेसाठी सौंदत्ती यात्रेदरम्यान व्यापक प्रमाणात गोकुळचे दूध व दुग्धजन्य उत्पादने पाठवण्यात आल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे तानाजी चव्हाण, गजानन विभूते, केशव माने, मोहन साळोखे, गोकुळचे अधिकारी लक्ष्मण धनवडे उपस्थित होते.