गोकुळ तूप- दही पुण्यातील डी मार्ट स्टोअरमध्ये
schedule20 Mar 24 person by visibility 247 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे तूप, दही व इतर दुग्धजन्य पदार्थ पुणे विभागातील सर्व डी मार्ट स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.यासंबंधीचा करार गोकुळ व्यवस्थापन आणि डी मार्ट यांच्यामध्ये झाला.
या अनुषंगाने गाय तूप सहा टन (६००० किलो) तर दही दीड टन (१५०० किलो) अशी पहिली खरेदी ऑर्डर डी मार्ट चे व्हा. प्रेसिडेंट ऑपरेशन्स श्री उत्तम पाटील यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे पुणे येथे दिली. चेअरमन डोंगळे म्हणाले, गोकुळची उत्पादने गुणवत्तापूर्ण आहेत.पुणे येथील ग्राहकांना गोकुळची उत्पादने खरेदी करून गोकुळला मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे. पुणे मार्केट मधील गोकुळच्या दुध, तूप, दही व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीचा विचार करता गोकुळची दर्जेदार उत्पादने पुणे येथील सर्व डी मार्टमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेणेत आला. सध्या पुणे विभागातील सर्व डी मार्ट स्टोअर मध्ये गोकुळ दुधाची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे. आता दूधाबरोबर तूप व दही तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांची उपलब्धता होणार असून याला देखील चांगला प्रतिसाद मिळेल. असा विश्वास गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला.
डी मार्ट व्यवस्थापनचे उत्तम पाटील म्हणाले, गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. आमच्या ग्राहकाकडून गोकुळची उत्पादने विक्रीस ठेवणे बाबत विचारणा होत होती, त्याच वेळी संघाचे मार्केटींग अधिकारी सुजय गुरव व त्यांच्या टीमने हा करार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. भविष्यात डी मार्ट मधील गोकुळ उत्पादनांच्या विक्रीचा आलेख वाढत जाईल.’ यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सहा.महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील, पुणे विभागातील मार्केटिंग अधिकारी सुजय गुरव, पांडुरंग गायकवाड , राजेश मिश्रा, विनोद घोडेकर आदी उपस्थित होते.