जिल्हा परिषद मतदारसंघ मोठे - समस्या अनेक ! विकासकामांसाठी हवा कोट्यवधींचा निधी, महायुतीच्या सदस्यांनी मांडल्या नेत्यांच्यासमोर भावना!!
schedule23 Nov 26 person by visibility 15 categoryजिल्हा परिषद
आम्ही तुमचेच कार्यकर्ते, सदस्यांना बळ द्या विकासकामांचे उद्घाटन तुमच्याच हस्ते करु या...
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जवळपास पाच वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत. मतदारसंघ मोठे अन् समस्या अनेक आहेत. विकासकामाच्या अनुषंगाने लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तेव्हा जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामांसाठी मोठा निधी द्या. आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत. समोर निवडणुका आहेत. सदस्यांना बळ द्या. मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन तुमच्याच हस्ते करू या…’अशा शब्दांत महायुतीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या भावना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ व अन्य आमदारांच्या समोर मांडल्या.
पंधरावा वित्त आयोगाचा निधी, जिल्हा नियोजन समितीकडील निधी वाटपसंबंधी चर्चा करण्यासाठी मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी २३ नोव्हेंबर २०२६ रेसिडेन्सी क्लब येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदस्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी, ‘जिल्हा परिषद सदस्यांना सन्मानजनक निधी देऊ. कोणीही नाराज होऊ नका. येत्या चार दिवसात सर्व आमदारांची बैठक घेऊ. सदस्यांनी ज्या भावना मांडल्या आहेत, त्या संबंधी सकारात्मक निर्णय होईल.’अशा शब्दांत आश्वस्त केले.
आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहूल आवाडे, आमदार अशोक माने, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. जिल्हा परिषदेत गेले काही दिवस जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधी वाटपाचा अधिकार सर्वस्वी कोणाचा यावरुन गरमागरम चर्चा सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणारा सर्व निधी वाटप करायचा अधिकार सदस्यांना हवा अशी सदस्यांची आग्रही मागणी आहे. दुसरीकडे निधी वाटप समसमान करा म्हणून महाविकास आघाडीच्या सदस्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले होते.
दरम्यान सोमवारी सायंकाळी हॉटेल रेसिडेन्सी येथे झालेल्या महायुतीच्या सदस्यांच्या बैठकीत नेतेमंडळींनी साऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्या. राष्ट्रवादीचे गटनेते व सदस्य सुधीर देसाई, संग्रामसिंह कुपेकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अनिरुद्ध रेडेकर, शिवसेनेचे आतिष शिंगे, राष्ट्रवादीचे अमर चव्हाण, विलास पाटील, प्रकाश मुगडे,भाजपचे अंबरिश घाटगे यांनी म्हणणे मांडले. कुपेकर म्हणाले, ‘नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे सगळे सदस्य एकत्रित काम करत आहेत. विकासकामांसाठी त्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा.’ गटनेते सुधीर देसाई यांनी,‘जिल्हा नियोजन समितीकडील २५२ कोटी निधीपैकी अधिकाधिक निधी सदस्यांना मिळावा. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेली सगळी मंडळी हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे व नेत्यांचे कार्यकर्ते आहेत. आमदार, मंत्री यांना विविध फंडस मिळतात. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. तेव्हा निधीत कपात करू नये. भविष्यात निवडणुका आहेत. सदस्यांना निधीचा पुरवठा करुन बळ द्या.’
सदस्य आतिष शिंगे, अनिरुद्ध रेडेकर यांनीही प्रभावीपणे मुद्दे मांडले. प्रकाश मुगडे यांनी मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांची तपशीलवार मांडणी केली. मतदारसंघातील एकूण शाळा, अंगणवाडया, आरोग्य केंद्राची स्थिती, रस्त्यांची दुरवस्था मांडत नेत्यांचे लक्ष वेधले. मतदारसंघात एकही मैदान नाही, व्यायामशाळा नाही. मतदारसंघाच्या विकासकामांसाठी तेरा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भरपूर निधी द्यावा. यंदा किमान चार कोटी रुपयांची विकासकामे होणे गरजेचे आहे. एकूण १३ कोटीच्या विकासकामापैकी २५ टक्के निधी त्वरित द्यावा अशी मागणी केली.
याप्रसंगी पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांनी, ‘जिल्हा परिषद सदस्यांना सन्मानजनक निधी देऊ. सदस्यांनी मतदारसंघातील कामात हयगय करू नये. येत्या चार दिवसात सगळया आमदारांची बैठक घेऊन सन्मानजनक निधी देऊ.’अशी ग्वाही दिली. बैठकीला बांधकाम समिती सभापती सारिका यशवंत नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा अविनाश गायकवाड, शिवसेनेचे गटनेते अरुण जाधव, सर्जेराव पाटील,सलीम महात,महेश पाटील, कुमार कांबळे, इंद्रजीत पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, नामदेव वाईंगडे, क्रांतिसिंह पवार पाटील,सदस्य मानसी भोगण, विनिता सागर भोगम, शिवाजी जाधव, मनोज फराकटे आदी उपस्थित होते. दरम्यान मंत्री आबिटकर यांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषद भेट दिली. याप्रसंगी महायुतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.
…………
कोण कुठं घाबरतयं….मुगडे जोरदार बोलले
नेतेमंडळींनी उपस्थित सदस्यांशी मनमोकळा संवाद साधला. मतदारसंघातील समस्या, अडचणी मांडाव्यात अशा सूचना केल्या. त्यावर काही सदस्यांनी, ‘नेतेमंडळीसमोर बोलताना काही सदस्य घाबरतात.’असे म्हटले. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी ‘कोण कुठं घाबरतंय…घाबरायचं काही कारण नाही. आता प्रकाश मुगडे जोरदार बोलले. मतदारसंघातील समस्या मांडल्या. तेव्हा सदस्यांनी मतदारसंघातील अडचणी खुलेपणोन सांगाव्यात.’अशी सूचना केली.