शेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !!
schedule27 Sep 23 person by visibility 603 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शेतकरी संघाच्या मालकीची इमारत अधिग्रहण करण्याच्या विरोधात कोल्हापुरात बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. हुकुमशाही पद्धतीने शेतकरी बझारची इमारत ताब्यात घेतल्या कारणावरून पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांचा निषेध नोंदवला. भवानी मंडप येथील शेतकरी संघाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
"कोल्हापूरची अस्मिता शेतकरी संघ वाचवा, मनुवादी पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, शेतकरी संघाची स्थावर मालमत्ता हडपणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार असो, छुपा रुस्तुम कोण, पालकमंत्रीशिवाय दुसरे कोण ? नही चलेगी,नही चलेगी - कोल्हापूर मे हुकूमशाही नही चलेगी" अशा घोषणा देत या आशयाचे फलक हाती घेऊन हा मोर्चा निघाला. शहरातील विविध मार्गावरून हा मोर्चा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय धडकला.
मोर्चाच्या अग्रभागी हलगीचा कडकडाट, बैलगाडीत शेतकरी संघ वाचविण्यासंदर्भातील चित्रमय फलक असे चित्र होते मोर्चामध्ये विविध पक्ष आणि संघटना तील पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शेतकरी संघाचे प्रशासक सुरेश देसाई, माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अर्बन बँकेचे संचालक संभाजीराव जगदाळे, उदय नारकर प्राचार्य टी.एस. पाटील, शेतकरी संघाचे कार्यकारी संचालक सचिन सरनोबत, माजी संचालक यंकाप्पा भोसले, विजय पोळ, धनाजी सरनोबत, जी. डी. पाटील, विजय चौगुले, बाबा इंदुलकर , शेकापचे बाबासाहेब देवकर, यांच्यासह विविध संघटनाचे प्रतिनिधी व शेतकरी संघाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. येथे आमदार ऋतुराज पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी चले जाओ - चले जाओ पालकमंत्री चले जाओ, जिल्हाधिकारी चले जाओ"अशा घोषणा दिल्या. शेतकरी संघाची मालक मनमानी पद्धतीने ताब्यात घेण्याचा आदेश देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी सरला पाटील, भारती पोवार, सुनील मोदी प्रतापसिंह जाधव, शिवाजीराव परुळेकर, इंद्रजीत सावंत, रवी जाधव, शेतकरी संघाचे कर्मचारी दीपक निंबाळकर, रवींद्र साळोखे, प्रकाश माने, बी एस पाटील आनंद देसाई, धनाजी पाटील, आकाराम पाटील, अनिल घाटगे, धनाजी दळवी, कमलाकर जगदाळे, शाहीर सदाशिव निकम, सुभाष देसाई, राजू जाधव, शंकर शेळके यांचा सहभाग होता. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. चुकीच्या पद्धतीने इमारत ताब्यात घेतली आहे. शेतकरी संघाची इमारत परत करावी. शेतकरी संघाचा मालक हा सभासद आहे. त्यांच्या मान्यते शिवाय कोणताही निर्णय होऊ शकत नाही अशी भूमिका मांडली. आदेश मागे घ्या अन्यथा सोमवारपासून कामकाज करू देणार नाही असा इशाराही दिला. दरम्यान जिल्हाधिकारी रेखावार यांनी, नवरात्र उत्सवामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगेसाठी तात्पुरत्या स्वरूपात शेतकरी संघाची इमारत अधिग्रहण केले आहे .रितसर प्रक्रियेद्वारे ही इमारत ताब्यात घेण्यात आली आहे. शेतकरी संघाच्या मालकीची इमारत कायमस्वरूपी ताब्यात घेतलेले नाही. शेतकरी संघाला या कालावधीतील भाडे देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.