भक्ती ईश्वराची-सेवा मानवाची या संकल्पनेनुसार वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत-डॉ. सतीश पत्की
schedule02 Nov 25 person by visibility 54 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भक्ती ईश्वराची-सेवा मानवाची या संकल्पनेनुसार वैद्यकीय क्षेत्रात कार्य केले. रुग्णांची सेवा आणि विश्वास हाच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने पुरस्कार आहे.’असे भावोत्कट उद्गार प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी काढले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले होते. यंदा परिषदेच्या केंद्रस्थानी ‘वैद्यकीय दृष्टीकोन केवळ शारिरीक लक्षणांच्या उपचारापुरता मर्यादित न ठेवता तो मानसिक व भावनिक आरोग्याकडेही केंद्रीत झाला पाहिजे.दृढ सामाजिक नातेसंबंध हे शरीर, मन आणि आत्म्यासाठी औषधाप्रमाणे काम करतात’ ही संकल्पना होती. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी (दोन ऑक्टोबर २०२५) रोजी केएमएतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. सतीश पत्की यांना ‘डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार’देऊन सन्मानित केले. रोख रक्कम, मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केएमएचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. मंदार जोगळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्राचे वाचन डॉ. आशुतोष देशपांडे व डॉ गौरी साईप्रसाद यांनी केले. हॉटेल सयाजी येथे हा कार्यक्रम झाला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पत्की यांनी वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाल उपस्थितांसमोर उलगडली. तसेच पत्की यांनी या पुरस्काराविषयी बोलण्यापूर्वी डॉ. अतुल जोगळेकर यांच्याशी निगडीत काही आठवणी सांगितल्या. डॉ. पत्की म्हणाले, ‘कोणतेही काम असो ते अचूक व प्रामाणिकपणाने करायचे हे संस्कार आई-वडिलांनी आपल्यात रुजविले. संशोधन, परिश्रम आणि सेवा ही त्रिसूत्री ठेवून वैद्यक क्षेत्रात काम केले. नव तंत्रज्ञान आत्मसात केले. वैद्यकीय क्षेत्रातील नवं संशोधनाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. भक्ती ईश्वराची-सेवा मानवाची या संकल्पनेनुसार रुग्णसेवा केली. पत्की हॉस्पिटलमध्ये एक लाख शस्त्रक्रिया आणि ३५ हजार प्रसुती केल्या. रुग्णांचा विश्वास हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे.’याप्रसंगी केएमएचे उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील, सचिव डॉ. अरुण मोराळे, राजेंद्र चिंचणेकर डॉ. शरद टोपकर, डॉ. शीतल पाटील, डॉ. पांडूरंग कदम, पदमाकर कापसे आदी उपस्थित होते.