तास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !
schedule06 Nov 26 person by visibility 58 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: अधिसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास हा महत्वाचा. विद्यापीठीय कामकाज, प्रशासकीय धोरण, परीक्षासह निकालासंबंधी कामकाज, महाविद्यालयाशी निगडीत विषय अशा विविध विषयावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित असते. प्रश्नोत्तरासाठी तासाभराचा कालावधी असल्याने मुद्देसूद उत्तर, प्रश्नावर दोन उपप्रश्न विचारण्यासंबंधी सभेचे संकेत ठरले आहेत. दरम्यान शुक्रवारी ६ नोव्हेंबर २०२६ झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत ना संकेत पाळले गेले…ना प्रश्नांची मांडणी झाली. प्रश्नोत्तराचा त्रास हा निव्वळ वेळकाढूपणाचा ठरला. एकाच प्रश्नाभोवती तास कसा खर्ची पडेल यादृष्टीने वाकयुद्ध रंगले. सभेसमोर उपस्थित साऱ्याच प्रश्नावर चर्चा झाली असती तर विद्यापीठीय कामकाजावरही प्रकाशझोत पडला असता. मात्र ठराविक प्रश्न सभेसमोर येऊ नयेत यासाठी टोलवाटोलवीचे नाटय घडले ते पाहून काही सदस्यांनी हा सारा प्रकार निश्चित सिनेटच्या कामकाजाला शोभणारे नव्हते अशा तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला. तासाभराच्या प्रश्नोत्तराच्या कालावधीतील प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद ठरण्यासारखी होती.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सिनेट सदस्यांचे तब्बल तेवीस प्रश्न अजेंडयावर होते. दुपारी एक वाजून २४ मिनिटाला प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. कुलगुरू आर. के. कामत सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कुलसचिव व्ही. एन. शिंदे सभेच्या सचिवपदी होते. प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात ही सभा झाली.
सिनेट सदस्य अजित रघुनाथ पाटील यांनी मागील दोन वर्षात विद्यापीठ परीक्षेवळी किती महाविद्यालयात मास कॉपी निदर्शनास आली आहे, त्यापैकी किती विना अनुदानित व अनुदानित महाविद्यालये किती आहेत असा प्रश्न विचारला होता. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी सभागृहाला ’११ विना अनुदानित व एक अनुदानित महाविद्यालय (अभ्यासक्रम विनाअनुदानित) अशा एकूण बारा महाविद्यालयात मास कॉपीचे प्रकार घडले आहेत.’असे सांगितले. त्यावर सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, अमित जाधव यांनी, ‘मास कॉपीचे प्रकार घडत असतील शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढणार ? मास कॉपीमध्ये कॉलेजिअसचा सहभाग आहे. काही ठिकाणी तर फळयावर उत्तरे लिहून दिली जातात. अशा कॉलेजवर गुन्हे दाखल करावेत.’अशी मागणी केली. मिठारी यांनी, मास कॉपीसंबंधीचा व्हिडीओ, स्क्रीन शॉटस सभाध्यक्ष कुलगुरू कामत यांच्याकडे देत ते सभागृहासमोर दाखविण्याची मागणी केली. मिठारी यांनी पेनड्राइव्ह दिला.दरम्यान कुलगुरू कामत यांनी, ‘शहानिशा केल्याशिवाय ते सभागृहात दाखविता येणार नाही’ असे स्पष्ट केले. सुटाचे सदस्य प्रा. प्रकाश कुंभार, मनोज गुजर, निवास वरेकर, प्रा. काळे यांनीही चर्चेत सहभागी होताना काही सूचना केल्या.
मास कॉपी प्रकरणी सिनेट सदस्यांनी संबंधित कॉलेजवर कारवाईच आग्रह धरला. मात्र प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नव्हते. दरम्यान या विषयावरील चर्चेला फाटे फुटत गेले. दरम्यानच्या काळातच सिनेट सदस्य मिठारी, जाधव यांनी सांगली प्रश्नोत्तर पत्रिकेतील दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधत होते. विद्यापीठामार्फत कायकिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी एकूण किती खर्च झाला, कोणकोणत्या अधिकार मंडळाची मान्यता घेतली होती असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र हा विषय चर्चेसाठी येऊ नये म्हणून सभागृहातच चक्रे फिरत होती. सिनेट सदस्यांनी उपस्थित केलेल्या पहिल्याच प्रश्नावर एकानंतर एक प्रश्न व उपप्रश्नांची मालिका सुरू झाली.
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने परीक्षा महत्वाची आहे. पारदर्शकता जपली पाहिजे असा मुद्दा काही सदस्यांनी मांडला. सिनेट सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड, सारंग कोल्हापुरे, अमित कुलकर्णी, काव्यश्री नलवडे यांनी मास कॉपीशी निगडीत कॉलेजसंबंधी प्रश्न उपस्थित केले. मास कॉपी प्रकरणी काही ठिकाणी जाणूनबुजून कारवाई केली असे कुलकर्णी यांनी म्हणताच सभाध्यक्ष कामत यांनी जाणूनबुजून हा शब्द योग्य नाही तो मागे घ्यावा असे सुचविले. दुसरीकडे सभेत विकास मंच आणि विकास आघाडीतील सदस्यामध्ये एक प्रकारची कुरघोडी पाहावयास मिळत होती.
वास्तविक विकास मंच आणि आघाडी सदस्य हे एकाच आघाडीत. मात्र सांगलीतील स्पर्धेवरुन दोघांच्या भूमिका वेगवेगळया होत्या. वास्तविक प्रशासनाकडून नेमके उत्तर देऊन पहिला प्रश्न निकालात काढण्याची गरज होती. मात्र सभागृहातील काहींनी पहिल्याच प्रश्नावर चर्चा घुटमळत राहिल या पद्धतीने प्रश्नोत्तरे विचारण्यास सुरुवात केली. सभाध्यक्षांनी, सभेच्या संकेतानुसार प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असे उत्तर देत प्रत्येकाला प्रश्न, दोन उपप्रश्न विचारण्याची संधी दिली. या दरम्यान मंच आणि विकास आघाडीतील सदस्यामध्ये काही वेळ खटके उडाले. पहिल्याच प्रश्नावरील उपप्रश्नांची लांबलेली मालिका, नेमक्या उत्तरचा अभाव अशा गदारोळातच प्रश्नोत्तरचा तास संपला. कायकिंग स्पर्धेसंबंधीचा दुसरा प्रश्न काही उपस्थित होऊ शकला नाही. क्रीडा विभागाच्या कामकाजावर काही चर्चा घडली नाही. या साऱ्या गदारोळमुळे व्यथित झालेल्या सिनेट सदस्य प्रताप पाटील यांनी, ‘सिनेट सभेचे संकेत पाळायला हवेत.’अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
……..
‘गेली पंधरा वर्षे मी सिनेट सदस्य म्हणून सभागृहात सहभागी होत आहे. मात्र आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ज्या घटना घडत होत्या ते पाहून वाईट वाटले. एखादा प्रश्न किती लांबवायचा…याला काही मर्यादा असतात. एकाचवेळी अनेक जण बोलणे हा सभागृहाचा वेळकाढूपणा आहे.असे प्रकार योग्य नाहीत. ’
अमरसिंह रजपूत, सिनेट सदस्य