डॉ. अनिरुद्ध पिपंळेंनी स्विकारला जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार
schedule12 Aug 24 person by visibility 335 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिरुद्ध नंदकुमार पिंपळे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. पिंपळे यांनी, सोमवारी (१२ ऑगस्ट) जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्विकारला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांची सातारा येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर पिंपळे यांची नियुक्ती झाली आहे. पिंपळे हे मूळचे धाराशिव येथील आहेत.ते सोलापूर येथे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारीपदी कार्यरत होते.
दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी गायकवाड यांनी जवळपास अकरा महिने कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांनी, ‘ग्रीन क्लिन डिसिप्लीन’ हे ब्रुीद वाक्य घेऊन कार्यप्रणालीची सुरुवात केली होती.‘ जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हयाची आरोग्य सेवा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर दिला. आरोग्य विषयक योजना जलदगतीने लोकांपर्यत पोहोचविण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात व त्याची भक्कम पायाभरणी यासाठी जास्तीत जास्त पाठपुरावा केला. आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आरोग्य सुविधा, गुणवत्तापूर्ण सेवा या पातळीवर कोल्हापूर जिल्हा ३७ व्या क्रमांकावरुन ९ व्या स्थानावर पोहोचला याचे समाधान वाटते.’असे गायकवाड यांनी सांगितले.
सोमवारी, सायंकाळी गायकवाड यांच्याकडून पिपंळे यांनी पदभार स्विकारला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संजय रणवीर, डॉ. फारुख देसाई, डॉ. सुशांत रेवडकर, डॉ. विनोद मोरे, अमर पाटील आदी उपस्थित होते.