तुम्ही निवडणुका जिंकण्यात पटाईत ! मी राजकारणात नवखा, भांडल्याशिवाय न्याय मिळत नाही ! ! आमदार शिवाजी पाटील, मंत्री मुश्रीफांत टोलेबाजी
schedule13 Oct 26 person by visibility 57 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर - : जिल्हा परिषदेची निवडणूक व प्राथमिक दूध संस्थांच्या पात्र अपात्रतेवरुन आमनेसामने उभे ठाकलेल्या चंदगडचे आमदार शिवाजी पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याध्ये गोकुळच्या निवडणुकीत सूर जुळले. गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे गोकुळच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे दूध उत्पादक ठरावधारकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आमदार पाटील यांनी, ‘मंत्री मुश्रीफ हे निवडणुका जिंकण्यात पटाईत आहेत, निवडणुका कशा जिंकाव्यात याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. मी राजकारणात नवखा आहे, आम्हाला भांडल्याशिवया न्याय मिळत नाही.’अशा शब्दांत गेल्या सहा महिन्यातील वादावर पडदा टाकला. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी, ‘तुमचे भांडण माझ्यापेक्षा भाजपातच अधिक होते, तुमच्यामध्येज जास्त भांडणे होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने महायुतीतील मतभेदांना गंगार्पण केले आहे.’
खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील, संजय घाटगे,डॉ. नंदिनी बाभूळकर, डॉ. स्वाती कोरी, डॉ. प्रतिभा चव्हाण, प्रकाश चव्हाण यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचार मेळावा झाला. मुश्रीफ यांनी भाषणात ‘आमदार शिवाजी पाटील हे आमच्यासोबत आहेत, हे दाखविण्यासाठी मेळावा घेत आहे. त्यांच्यातील व माझ्यातील मतभेद संपले आहेत. गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार पाटील, संचालिका शौमिका महाडिक व माझ्यातील मतभेद मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गंगेला सोडले आहेत.’
आमदार पाटील यांनी व्यासपीठाकडे पाहत,‘गोकुळच्या राजकारणात अनुभवी आणि कट्टर राजकीय मंडळी आहेत. राजकारणात मी नवखा आहे. आमच्यासारख्या नवख्याला भांडल्याशिवाय गडहिंग्लज न्याय मिळत नाही. म्हणून माझे भांडण होते. मंत्री मुश्रीफ व माझ्यामध्ये वैयक्तिक भांडण नाही. गोकुळच्या निवडणुकीपूर्वी मंत्री मुश्रीफ व माझ्यामध्ये मतभेद होते. परंतु गडहिंग्लज विभाग व भाजपला न्याय मिळावा यासाठी मी भांडत होतो. जागा वाटपात भाजपाला सात जागा मिळाल्या. काही अंशी हेतू साध्य झाला. शिवसेनेला सात जागा मिळाल्या. आता स्वीकृत संचालक म्हणून आणखी एक जागा आमच्या भागाला मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.’ याप्रसंगी उमेदवार व माजी आमदार राजेश पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक, राहुल पाटील, दीपक पाटील, सतीश पाटील, अशोक चराटी, युवराज पाटील, अर्चना पाटील, अजित नरके, अजित पाटील, एस. आर. पाटील, रणजित पाटील, रणजीत दिलीप पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, विश्वास जाधव, विरेंद्र मंडलिक, प्रताप पाटील कावणेकर, अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, मदन देसाई आदी उपस्थित होते.
………………..
मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला….
मंत्री मु्श्रीफ यांनी भाषणात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ‘सतेज पाटील हे एकटा लढत असल्याचे सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुधा त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असावे.त्यांच्याकडे एक हजारपेक्षा अधिक मते नाहीत. मात्र १८०० मते असल्याचा ते सांगतात. आता क्रॉस व्होटिंगसाठी त्यांची धडपड सुरू आहे. ’