गोकुळमध्ये सहकार दिनानिमित्त विविध उपक्रम, बचत गटाच्या स्टॉलवर हजारोंची उलाढाल
schedule05 Jul 25 person by visibility 30 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापना सप्ताह व आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीची थीम “सहकार सर्वांसाठी चांगले भविष्य घडवतात” अशी आहे, या संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम झाला.
गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालय येथे विविध विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ, महालक्ष्मी पशुखाद्य, आयुर्वेदिक उपचार व उत्पादने, महिला डेअरी सहकारी नेतृत्व विकास कक्ष, स्लरी उत्पादने आदींचा समावेश होता. स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) निळकंठ करे आणि सहाय्यक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले
उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे म्हणाले “गोकुळ ही केवळ दुग्ध संस्था नाही तर सहकार क्षेत्रातील एक आदर्श मंदिर आहे. संस्थेने दर्जेदार सेवा, आर्थिक पारदर्शकता आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सहकार मूल्यांची सातत्याने जपणूक केली आहे.” दरम्यान सहकार दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या ताराबाई पार्कात संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
संचालक विश्वास पाटील यांचे भाषण झाले तर, ‘सहकार’ या विषयावर डॉ. एम. पी. पाटील यांचे व्याख्यान झाले. प्रदर्शनात गोकुळच्या महिला विकास व बचत गट तसेच गोकुळच्या दूध उत्पादनांच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. महिला गटाच्या स्टॉलवर सुमारे ३५ हजार तर गोकुळच्या दूध उत्पादनांच्या स्टॉलवर १५ हजार अशी एकूण ५० हजार रुपयांची उलाढाल झाली. चेअरमन नविद मुश्रीफ यांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संघाचे संचालक अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, श्रीमती अंजना रेडेकर, सहाय्यक निबंधक चंद्रकांत निंबाळकर, सहाय्यक निबंधक इसुफ शेख, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, जिल्हा महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ, विजय मगरे, हनमंत पाटील उपस्थित होते.