शरद पवार पक्षाच्या मेळाव्याला हाऊसफुल्ल गर्दी !आगामी निवडणूक कार्यकर्त्यांची, आघाडीचे सर्वाधिकार जिल्हा पातळीवर हवेत !!
schedule05 Jul 25 person by visibility 107 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी आहेत. या निवडणुकीत अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी या निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर द्या’अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उमटल्या. या मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्म पाळतो. मात्र काँग्रेसकडून आघाडी धर्माचे पालन होत नसल्याची टीका केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी कोल्हापुरात झाला. पक्षाचे निरीक्षक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक होते. साईक्स एक्स्टेंशन येथील श्री महालक्ष्मी सभागृह येथे झालेल्या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी, ‘ लोकसभेला चांगली कामगिरी झाली होती. मात्र विधानसभेला पराभव झाला. तरीही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेटवर्क उत्तम आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा कार्यकर्ता ही आपली ताकत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढवू. तालुकानिहाय मेळावे होतील.’ शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला आघाडीच्या पदमा तिवले यांनी, शहरात राष्ट्रवादीची ताकत आहे. पक्षाने ताकत दिली तर महापालिकेवर झेंडा फडकवू.’ रामराजे कुपेकर म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर द्या. विधानसभेला चंदगड मतदारसंघात काही पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही’ कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीला कागल मतदारसंघात काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. काँग्रेसने धर्म पाळला असता तर कागलमधून समरजितसिंह घाटगे आमदार झाले असते.’ आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवणुकीत जिल्हा पातळीवर निर्णय घेताना तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विचारात घ्यावे.’ माजी आमदार राजू आवळे यांनी, कार्यकर्ते न खचता पक्षासाठी लढत आहेत. त्यांना साथ मिळाली तर आगामी निवडणुकीत चांगले यश मिळवू.’
समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘पक्षातून ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. नवीन लोकांना संधी मिळेल असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. यामुळे कोणी पक्षातून बाहेर पडला म्हणून थांबायचे नाही. आगामी निवडणूक ताकतीने लढवायची असेल तर विधानसभा निवडणुकीचे रडगाणे थांबवायला हवे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर असायला हवेत. जिल्हाभर हा निर्णय असायला हवा. कागलमध्ये आम्ही आणि कार्यकर्ते समर्थ आहोत.’‘
मेळाव्याला झालेली गर्दी पाहून आमदार शशिकांत म्हणाले, ‘पक्ष संपला अशी टीका करणाऱ्यांनी आजच्या मेळाव्याकडे पाहावे. कोल्हापूरची भूमी लढवय्याची आहे.नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन काम करा. हे सरकार कंत्राटदार पोसण्याचे काम करत आहे. पक्ष संघटन करुन लोकांना न्याय मिळवून द्या. पक्षात काम करणाऱ्यांना पदे मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. कोणी आघाडी धर्म पाळत नसेल तर आपलीही स्वबळाची तयारी असावी ही भावना पक्षाच्या नेत्यापर्यंत पोहचवू.’
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ’कोल्हापूर जिल्हा हा शाहू-फुले-आंबेडकर विचारांचा आहे. हा जिल्हा नेहमी शरद पवार यांच्या पाठीशी आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवा, पक्ष संघटन करा. जनतेचे प्रश्न हाती घेऊन काम करा, निश्चित लोक पाठीशी राहतील. नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. ’ याप्रसंगी गगनबावडा येथील महिला पदाधिकारी सुचित्रा पडवळ यांनी लोकसभा निवडणुकीत गगनबावडा तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नियोजनात सामावून घेतले नसल्याची खंत व्यक्त केली. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, रोहितदादा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष मेंगाणे यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मदन कारंडे, सुनील देसाई, बाजीराव खाडे, विनय कदम, अश्विनी माने, रोहित पाटील, निरंजन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.